आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कोपरगाव शहर:नैसर्गिक संकटे आली तरीही शेतकरी शेती करणे सोडत नाही : पंजाबराव डख

नगर8 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

भारत देश हा मुळातच कृषीप्रधान देश आहे. देशाची निम्म्याहून अधिक अर्थव्यवस्था शेतीवरच अवलंबून आहे. कोणत्याही मार्गाने नैसर्गिक संकटे आली तरी, शेतकरी शेती करणे सोडत नाही. जगातले सगळे उद्योग बंद पडतील परंतु शेती आणि मेडिकल हे दोन उद्योग मात्र कधीच बंद होऊ शकत नाही. शेतकरी थांबला तर संपूर्ण जग थांबून जाईल असे प्रतिपादन प्रसिध्द हवामानतज्ज्ञ पंजाबराव डख यांनी संवत्सर येथील कार्यक्रातून केले.

गोदावरी खोरे नामदेवरावजी परजणे पाटील तालुका सहकारी दूध संघाचे संस्थापक दिवंगत नेते नामदेवराव परजणे पाटील (आण्णा) यांच्या अठराव्या पुण्यस्मरण सोहळ्यानिमित्त संवत्सर येथे आयोजित कार्यक्रमात “शेती काल, आज आणि उद्या या विषयावर ते बोलत होते. जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा शालिनी विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या सोहळ्यासाठी पंचायत समितीचे माजी सदस्य कृष्णराव परजणे, गोदावरी दूध संघाचे संचालक राजेंद्र जाधव, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य शरद नवले, गटविकास अधिकारी सचिन सूर्यवंशी, अॅड. अशोक म्हस्के, कृषी अधिकारी पंडित वाघिरे, सरपंच सुलोचना ढेपले यांची प्रमुख उपस्थिती होती. प्रारंभी स्व. परजणे आण्णा यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. गोदावरी खोरे दूध संघाचे अध्यक्ष राजेश परजणे पाटील यांनी स्वागत व प्रास्ताविक केले.

अलिकडच्या काही वर्षात पर्यावरणाचे असंतुलन मोठ्या प्रमाणावर वाढल्याने शेतकऱ्यांना याचा मोठा फटका बसलेला आहे. शेतीचे नुकसान टाळण्यासाठी शेतकऱ्यांनी निसर्गाच्या लहरीपणाचा अंदाज घेऊनच आपली शेती करावी असे सांगून डख म्हणाले, मागील दोन अडीच वर्षापूर्वी कोरोनाच्या काळात अनेकांना ऑक्सिजनअभावी आपला जीव गमवावा लागला. ऑक्सिजन किती महत्वाचा आहे हे कोरोनाने आपल्या निदर्शनास आणून दिले आहे. जमिनीच्या तापमानात वाढ झाल्याने पावसाचे प्रमाणही असंतुलीत झाले आहे. कुठे काहीच नाही तर, काही ठिकाणी अतिवृष्टी होत आहे. यात शेतीचे प्रचंड नुकसान होण्याचे प्रमाण वाढले आहे. यावेळी शालिनी विखे यांनीही मार्गदर्शन केले. संवत्सर येथील नामदेवराव परजणे पाटील महाविद्यालय व कोपरगाव येथील महिला महाविद्यालयातील गरजू व गरीब विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीचे धनादेश वितरित करण्यात आले. यावेळी नानासाहेब सिनगर, सुभाष होन, विजय जाधव, निवृत्ती नवले, भाऊसाहेब काळे, अजय आव्हाड, सुदाम शिंदे, गोरखनाथ शिंदे, लक्ष्मण साबळे उपस्थित होते. उपसरपंच विवेक परजणे यांनी आभार मानले. संवत्सर येथे बोलताना हवामान अभ्यासक पंजाबराव डख.

बातम्या आणखी आहेत...