आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिरंगाई:मोताळा तालुक्यात शेतकरी अजूनही पीक कर्जाच्या प्रतिक्षेत; कर्ज वाटपाची गती वाढवा

हमीद कुरेशी|मोताळाएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

मागील वर्षी झालेल्या अति पावसामुळे तालुक्यातील बहुतांश भागातील पिके पाण्याने खरडून गेली होती. त्यामुळे उत्पन्नात घट झाली, त्यातच बियाण्यांच्या वाढत्या किंमती तसेच शेतमालाला मिळत असलेला कमी भाव यामुळे शेतकरी संकटात सापडला आहे. अशात शेतकऱ्यांना पीक कर्जाची आशा होती परंतु बँकांनी अल्प शेतकऱ्यांना पीक कर्जाचे वाटप केल्याने बहुतांश शेतकरी अजूनही पीक कर्जाच्या प्रतीक्षेत असून पिकाला लागणारी औषधी यासह इतर खर्च कसा करावा ही चिंता शेतकऱ्यांना सतावत आहे.

तालुक्यातील भौगोलिक क्षेत्रफळ ७८ हजार ४८० हेक्टर क्षेत्रफळ असून त्यापैकी ५८ हजार ७५१ हेक्टर क्षेत्रफळ हे खरिपाच्या पेरणीस योग्य आहे. तालुक्यात सात महसूल मंडळे असून जवळपास ३८ हजार शेतकरी आहेत. मागील वर्षी खरिपाची पेरणी झाल्यानंतर अतिप्रमाणात झालेल्या पावसाने पिके खरडून गेली होती तर रब्बीच्या वेळी अवकाळी पावसाने सुरुवात केली होती. त्यामुळे शेतीच्या उत्पन्नात मोठ्या प्रमाणात घट झाली. खरीप आणि रब्बीची पिके हातातून गेल्याने शेतकऱ्यांना पीक कर्जाची आशा होती. यंदा मान्सून चांगला असून पिकांना आवश्यक असलेला पाऊस पडणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवल्यामुळे तालुक्यातील शेतकऱ्यांनी जवळ होते नव्हते ते पूर्ण पैसे पेरणीत लावून बसले आहे तर काही शेतकऱ्यांनी उसनवारी करून शेतीचा खर्च भागवला. आता पिके बहरली असून ऐन पिकांना फवारणी व खताची आवश्यकता असताना शेतकऱ्यांजवळ पैसे नाही अशा काळात पैसे कोठून आणावे हा प्रश्न शेतकऱ्यांना सतावत आहे.

तालुक्यात जवळपास दहा राष्ट्रीयकृत बँकांतून शेतकऱ्यांना दरवर्षी पिक कर्जाचे वाटप करण्यात येते. त्यासाठी शेतकऱ्यांनी पीक कर्जासाठी ठरवून दिलेल्या राष्ट्रीयकृत बँकांकडे कागदपत्रांची जुळवाजुळव करून अर्ज सादर केले आहे. ऑगस्ट अखेरपर्यंत बँकांनी मोजक्या शेतकऱ्यांना पीक कर्जाचे वाटप केले आहे तर तालुक्यातील बहुतांश शेतकरी अजूनही पीक कर्जाच्या प्रतीक्षेत आहे. अशा कठीण काळात बँकांनी पीक कर्जाची गती वाढवणे गरजेचे झाले आहे, जेणेकरून आर्थिक अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांना दिलासा मिळेल तसेच तालुक्यातील शेतकऱ्यांना आर्थिक मदत होईल.

पीक कर्जाला गती देण्याची गरज
दोन महिन्यांपासून पीक कर्जासाठी कागदपत्रांची जुळवाजुळव करून बँकेत जमा करून दिले आहे. परंतु बँकेने कोणत्याही प्रकारची दखल घेतली नाही आधीच मागील वर्षी झालेल्या अतिपावसाने तसेच अवकाळी पावसाने उत्पन्नात घट झाली आहे. त्यामुळे आर्थीक अडचण निर्माण झाली आहे.त्यामुळे बँकांनी लवकरात लवकर पिक कर्जाची वाटप करावी.
हरीभाऊ सोनोने, शेतकरी आडविहिर.

बँकांनी शेतकऱ्यांना केलेले पीक कर्जाचे वाटप
जिल्हा केंद्रीय सहकारी बँक मोताळा यांनी केवळ ७२१ शेतकऱ्यांना ५७६.४१ लाख रुपयांची वाटप केली आहे. मोताळा स्टेट बँकेने १ हजार १०० शेतकऱ्यांना १० कोटी १४ लाख रुपयांचे वाटप केले तर विदर्भ क्षेत्रीय ग्रामीण बँक यांनी ८२७ शेतकऱ्यांना ९.५ कोटी रुपये दिले आहे. स्टेट बँक धा.बढे यांनी १३.५ कोटी वाटप केली आहे. स्टेट बँक पिंपळगाव देवी यांनी १२.६३ कोटी वाटप केले आहे. विदर्भ क्षेत्रीय ग्रामीण बँक शेलगाव बाजार यांनी ११.४३ कोटी वाटप केले आहे तर स्टेट बँक पोफळी येथील शेतकऱ्यांना ५ कोटी रुपयांची वाटप केली आहे.

शेतकऱ्यांना पीक कर्जाचे लवकर वाटप करावे
मागील वर्षी अति पावसामुळे शेतातील खरिपाची पिके खरडून गेली होती. त्यामुळे उत्पन्नात घट झाली होती तसेच अवकाळी पावसाने रब्बीची पिके हातातून गेली होती. त्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. म्हणून शेतकऱ्यांना बँकांकडून पीक कर्जाची आशा होती. परंतु काही शेतकऱ्यांना पिक कर्जाची वाटप करण्यात आली असून बहुतांश शेतकरी अजूनही पिक कर्जाच्या प्रतीक्षेत आहे. त्यामुळे बँकांनी शेतकऱ्यांची आर्थीक अडचण पाहता पीक कर्जाची गती वाढवून लवकर शेतकऱ्यांना पीक कर्जाचे वाटप करावे.
प्रवीण जवरे, भाजपा कार्यकर्ता मोताळा.

बातम्या आणखी आहेत...