आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करारब्बीचा हंगाम सुरू असल्याने शेतकऱ्यांकडून खताला मागणी वाढली आहे. खताचे दर शासनाने निश्चित केले असले तरी, काही विक्रेत्यांकडून खताच्या बॅगबरोबर इतर महागडी उत्पादने खरेदी करण्याची अट घालून लिंकिंगला खतपाणी घातले जात असल्याचे प्रशासनाच्या निदर्शनास आले आहे. याप्रकरणी शेतकऱ्यांनी तक्रार केल्यास कारवाई करण्याचा इशारा कृषी विभागाने दिला आहे.
जिल्ह्यात सुमारे 2 हजार 434 अधिकृत विक्रेते आहेत. रब्बीच्या पेरण्या पूर्ण झाल्या असून खताला मागणी वाढली आहे. युरीया, एमओपी, एसएसपी, डीएपी आदी संयुक्त खते उपलब्ध आहेत. युरिया ठोकळ व बारिक या दोन प्रकारात उपलब्ध असून एका बॅगची किंमत सुमारे 270 रूपये आहे. बारिक युरिया लवकर विरघळणारा असल्याने, त्याला शेतकऱ्यांकडून मागणी वाढली आहे. परंतु, बारिक युरिया खरेदी करताना त्याबरोबर 150 ते 170 रूपयांची इतर उत्पादने खरेदी करण्याची अट काही विक्रेत्यांकडून घातली जात असल्याचे प्रशासनाच्या निदर्शनास आले आहे. हा लिकिंगचा प्रकार असल्याने, भरारी पथक ग्राहक रूपात जाऊन तपासणी करण्याच्या तयारीत आहे. जिल्ह्यात सद्यस्थितीत १ लाख १५ हजार ९११ मेट्रिकटन खत शिल्लक आहे. दुसरी बाजू अशीही आहे की, कंपन्यांकडूनच, किरकोळ विक्रेत्यांना इतर उत्पादने खरेदीची सक्ती होते का ? याच्या तपासणीचा प्रशासनाला विसर पडला आहे.
लिकिंगला संघटनेचा विरोध
जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनात बैठक झाली होती. त्यानुसार डिस्ट्रिब्युटरने लिकिंग करू नये असे ठरले होते. जर कोणी बेकायदेशीरपणे लिकिंग करत असेल तर त्याला संघटनेचा विरोध आहे.
- सतीश मुनोत, अध्यक्ष, फर्टीलायझर असोसिएशन
तक्रार आल्यास तत्काळ कारवाई
शेतकऱ्यांना खताबरोबर इतर उत्पादन खरेदीची अट घालणे चुकीचे आहे. असे होत असेल तर शेतकऱ्यांनी थेट तक्रार करावी, तत्काळ कारवाई केली जाईल. तसेच पथकही सज्ज आहे.
- शंकर किरवे, जिल्हा कृषिविकास अधिकारी.
शेतकऱ्यांची लुट थांबवा
लिकिंग पद्धतीने शेतकऱ्यांची सुरू असलेली लूट तत्काळ थांबवा. भरारी पथकांनी ग्राहक बणून तपासणी केल्यास वस्तुस्थिती समोर येईल. जिल्हा कृषी अधीक्षक कार्यालयाने याकडे लक्ष द्यावे.
- अनिल घनवट, ज्येष्ठ नेते, शेतकरी संघटना.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.