आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बेटी सुरक्षा अभियान:बाल लैंगिक अत्याचाराविरुद्ध लढा गरजेचा ; प्रज्ञा डोलारे यांचे प्रतिपादन

नगरएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

मुलींचे बाल लैगिक अत्याचारापासून संरक्षण व्हावे म्हणून नेदरलँड्स या देशापासून सुरु झालेले फ्री अ गर्ल संस्थेचे कार्य आज ७ देशांत सुरु आहे. भारतातही मानवी तस्करी व बाल अत्याचाराच्या घटना मोठ्या प्रमाणात वाढत आहेत. त्या पार्श्वभूमीवर या संस्थेच्या माध्यमातून भारतात कार्य सुरु केले आहे. मुलींच्या संरक्षणासाठी सीएसआरडीच्या मदतीने स्वतंत्र बेटी सुरक्षा अभियानाची आखणी करण्यात आली आहे, असे प्रतिपादन फ्री अ गर्ल इंडियाच्या प्रमुख प्रज्ञा डोलारे यांनी केले.

येथील सीएसआरडी समाजकार्य व संशोधन संस्था व आंतरराष्ट्रीय पातळीवर बाल संरक्षणासाठी कार्यरत असणारी फ्री अ गर्ल संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने राज्य पातळीवर बेटी सुरक्षा अभियान राबवण्यात येणार आहे. या अभियानाचे उद्घाटन सीएसआरडीच्या सभागृहात पार पडले. अभियानाचे राज्य समन्वयक सॅबिस्टीन फ्रांसिस व सीएसआरडी संचालक डॉ.सुरेश पठारे यांच्या संकल्पनेतून व पुढाकारातून हे अभियान साकारण्यात आले आहे. यावेळी व्यासपीठावर सीएसआरडीचे डॉ.सुरेश मुगुटमल, प्रा. प्रदीप जारे, प्रा. विजय संसारे, डॉ. जेमोन वर्गीस, ज्येष्ठ मानव अधिकार कार्यकर्ते अॅड. वाल्मिक निकाळजे, श्री.सिरील आशीर्वादाम, नागसेन, अशोक शिरसाठ आदी उपस्थित होते.

सॅबिस्टीन फ्रांसिस म्हणाले, सुरवातीला अभियानासाठी महाराष्ट्र राज्य निवडण्यात आले आहे. राज्य पातळीवर बाल अधिकार व संरक्षण याविषयावर व्यापक प्रबोधनपर कार्यक्रम राबवण्यात येणार आहे. कालांतराने हे अभियान इतर संस्थांच्या मदतीने राष्ट्रीय पातळीवर बेटी सुरक्षा अभियान व्यापक करण्याचा मानस आहे. यासाठी महाराष्ट्रातील बाल अधिकाराच्या क्षेत्रात कार्य करीत असलेल्या प्रशिक्षित सामाजिक कार्यकर्त्यांची फळी उभारण्यात येणार असल्याचे त्यांनी आवर्जून सांगितले. यानंतर सिरील आशीर्वादाम यांनी हे अभियान कशा पद्धतीने राबवले जाईल याबाबत माहिती दिली. तर अॅड. वाल्मिक निकाळजे यांनी पॉस्को कायद्याबाबत मांडणी केली. बाल अत्याचाराविरुद्ध काम करत असताना कायद्याची माहिती सामाजिक कार्यकर्त्यांना असणे आवश्यक आहे. येणाऱ्या दिवसात याबाबत प्रशिक्षण कार्यक्रम राबवण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली. यशस्विततेसाठी सीएसआरडीचे श्रीकांत तलोलकर, दीपक बनसोडे, अमित दिगल आदींनी परिश्रम घेतले. सूत्रसंचालन सॅम्युअल वाघमारे यांनी केले.

बातम्या आणखी आहेत...