आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करासप्टेंबर व ऑक्टोबर महिन्यांत झालेल्या अतिवृष्टीने शेवगाव तालुक्यातील खरीप पिकांचे मोठे नुकसान होत पिके पाण्याखाली गेली. तहसीलदारांनी गुरूवारी दुपारी तालुक्यातील खरीप हंगामाच्या बोधेगावसह एकूण ३४ गावांची अंतिम आणेवारी जाहीर केली. ही आणेवारी पन्नास पैशांपेक्षा कमी असल्याने ओल्या दुष्काळावर शिक्कामोर्तब झाले आहे. दरम्यान, पन्नास पैशांपेक्षा कमी पैसेवारी घोषित झाल्यामुळे या गावांमध्ये शासनाच्या दुष्काळी उपाययोजना राबवण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
शासकीय नियमान्वये दरवर्षी खरीप हंगामाची नजरअंदाज पैसेवारी १५ सप्टेंबर रोजी, तर सुधारित आणेवारी ३१ ऑक्टोबरला आणि अंतिम १५ डिसेंबर रोजी जाहीर केली जाते. त्यानुसार तहसीलदार छगन वाघ यांनी गुरूवारी दुपारी यंदाच्या खरीप हंगामाची पैसेवारी लेखी आदेश काढून जाहीर केली. तालुक्यात यंदा सुरुवातीच्या काळात समाधानकारक पाऊस झाल्याने खरीप हंगामात मोठ्या आशेने केलेल्या पेरण्या नंतरच्या पावसाने प्रदीर्घ उघडीप दिल्याने संकटात सापडल्या होत्या.
पावसाचा खंड, किड-रोगाचा प्रादुर्भाव यांमुळे अगोदरच उत्पन्नात घट आलेली असताना गत सप्टेंबर व आॅक्टोबर महिन्यांत हजेरी लावलेल्या पावसाने खरीप पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. तब्बल १५ ते २० दिवस पाऊस कोसळत राहिल्याने वेचणीस आलेला कापुस, बाजरीचे कणसे, भुईमुगाच्या शेंगा, सोयाबीन आणि फुलोऱ्यांत आलेल्या तुरीला मोठा फटका बसला. हाता-तोंडाशी आलेला घास परतीच्या पावसाने पळवल्याने चांगल्या उत्पादनाचे स्वप्न भंगत शेतकऱ्यांचा धीर खचला.
तालुक्यातील गावोगावी अशी बिकट पिक स्थिती असताना महसुल प्रशासनाने बोधेगाव, चापडगावसह शेवगाव मंडळातील जिरायती शेतीची खरीप हंगामाची सुधारित आणेवारी सुद्धा पन्नास पैशांपेक्षा अधिक असल्याचे ३१ ऑक्टोबरला जाहीर केले होते. त्यावर दै. दिव्य मराठीने वेळोवेळी पाठपुरावा करत वेळोवेळी वृत्त प्रकाशित करून वास्तविकता समोर आणली होती. आता शेतकऱ्यांना मदतीची अपेक्षा आहे.
अंतिम आणेवारी पुढीलप्रमाणे
अधोडी ४८, आंतरवाली बुद्रुक ४८, आंतरवाली खुर्द शे ४९, बेलगाव ४७, बाडगव्हाण ४८, बोधेगाव ४८, चेडेचांदगाव ४९, दिवटे ४७, गोळेगाव ४८, हसनापूर ४८, कोळगाव ४८, कोनोशी ४७, लाडजळगाव ४८, माळेगाव ने ४८, मंगरूळ बुद्रुक ४९, मंगरूळ खुर्द ४९, मुरमी ४७, नागलवाडी ४९, नजीक बाभूळगाव ४८, राक्षी ४८, राणेगाव ४८, सालवडगाव ४८, सुळे पिंपळगाव ४८.
मदत लवकर जमा करावी
प्रशासनाने शेतकऱ्यांच्या मागणीबाबत सकारात्मक विचार करून अंतिम पैसेवारी पन्नास पेक्षा कमी जाहीर केल्याने पीक परिस्थिती बिकट असल्याचे सिद्ध झाले आहे. आता अतिवृष्टी बाधितांना शासन नियमानुसारची घोषित मदत लवकरात लवकर खात्यावर जमा करावी.''-दत्ता फुंदे, जिल्हा उपाध्यक्ष, स्वाभिमानी शेतकरी संघटना.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.