आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भाजपचा यु टर्न:आधी समर्थनाचे पत्र दिले; आता विरोध करत महापौरांवर खापर

नगर2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

सावेडीतील प्रस्तावित स्मशानभूमी व दफनभूमीसाठी जागा खरेदीचा ३२ कोटी रुपये खर्चाचा ठराव किंवा या व्यवहाराशी भाजपचा कुठलाही संबंध नाही. पक्षाचा या दोन्ही गोष्टीला विरोधच आहे. ठराव किंवा व्यवहाराला सर्वस्वी महापौरच जबाबदार आहेत, अशी भूमिका शहर जिल्हाध्यक्ष महेंद्र गंधे यांनी मांडली आहे. दरम्यान, सभेच्या एक दिवस आधीच आरक्षण प्रस्तावित करण्यासंदर्भात समर्थन दर्शविणारे पत्र गंधे यांच्यासह भाजपच्या इतर चार नगरसेवकांनी दिलेले आहे. त्यामुळे या मुद्द्यावरून भाजपने ‘यू टर्न’ घेतल्याचे चित्र आहे.

सर्वसाधारण सभेत या विषयाला मी व भाजपच्या नगरसेवकांनी कोणत्याही स्वरूपात पाठिंबा दिलेला नाही किंवा त्याचे समर्थनही केले नाही. या विषयाला पक्षाच्या नगरसेवकांचाही विरोधच केला आहे. शहरात विनाकारण पक्षाची बदनामी केली जात आहे. सर्वसाधारण सभेत स्मशानभूमी व दफनभूमीचा विषय अजेंड्यावर घेण्याचा व त्यावर कार्यवाही करण्याचा अधिकार त्यांचाच आहे. महापौरांच्याच निर्णयानुसार सर्व कार्यवाही झाली आहे. हा ठराव आयुक्तांनी विखंडित करावा, अशी मागणीही गंधे यांनी पत्रकाद्वारे केली आहे.

मात्र, सभेच्या एक दिवस आधीच गंधे यांच्यासह भाजपच्या रवींद्र बारस्कर, वंदना ताठे, सोनाबाई शिंदे, मनोज दुलम या नगरसेवकांनी आरक्षण प्रस्तावित करण्याच्या दृष्टीने समर्थन दर्शवणारे पत्र दिले आहे. काही नगरसेवकांनी पत्रात जागेचा उल्लेख व सर्वे नंबर टाकलेला नाही. आता या विषयावरून भाजपवर टीका झाल्यामुळे विषयाला विरोध करत भाजपने ‘यू टर्न’ घेतल्याचे चित्र आहे.

हे नगरकरांना वेडे समजतात : काळे
भाजपने पक्षाचा आणि नगरसेवकांचा या घोटाळ्याला विरोधच होता आणि आहे, असे म्हटले आहे. खरे तर हे नगरकरांना वेड समजत आहेत. महासभेच्या आदल्या दिवशी भाजपच्या एक नव्हे तर तब्बल पाच नगरसेवकांनी एकाच वेळी या ठरावाला महासभेपूर्वीच हा ठराव संमत करण्याची मागणी वजा पाठिंबा देणारे लेखी पत्र आयुक्तांना दिले होते, असा दावा काळे यांनी केला आहे. ही पत्र खोटी असतील तर भाजपवाल्यांनी विशाल गणपती समोर येऊन शपथ घ्यावी, असे आव्हानही त्यांनी दिले आहे.

बातम्या आणखी आहेत...