आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गुन्हेगारी:आधी म्हशीची धडक, नंतर काठीने मारले; मृत गायकवाडच्या आईने दिली फिर्याद

नगर3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

म्हशीच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू झाल्याच्या घटनेला वेगळे वळण मिळाले आहे. म्हशीच्या धडकेनंतर मृत विवेक विक्रम गायकवाड (वय २६) याला म्हशी चरवणाऱ्या इसमाने काठीने मारल्याचे प्रत्यक्षदर्शीने सांगितल्याचा दावा विवेक याच्या आईने केला आहे. त्यांनी तोफखाना पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.मृत विवेक याची आई भारती विक्रम गायकवाड (वय ५५ वर्ष, रा. नगर) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार अमित विलास निस्ताने (रा. नगर) याच्याविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

त्याला न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. १६ ऑगस्ट रोजी सायंकाळी मयत विवेक हा दुचाकीवरून जात असताना मिस्किन मळा रस्त्यावर त्याला म्हशीने धडक दिली. यात तो मयत झाला होता. या प्रकरणी सुरुवातीला तोफखाना पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली होती. आता मृत विवेक याच्या आईने फिर्याद दिली आहे.मुलगा विवेक हा दुचाकी गाडीसह पडलेला होता. त्याच्या शेजारून म्हशी जात होत्या. म्हशी चरवणाऱ्या इसमाने त्याला काठीने मारले व त्यामुळे विवेक हा न उठता तसाच रस्त्यावर पडला होता. सोहेल सय्यद याने तेथून जाणाऱ्या रिक्षातून विवेकला मॅककेअर हॉस्पिटल येथे नेल्यावर डॉक्टरांनी विवेक हा उपचारापूर्वीच मृत झाला असल्याचे घोषित केले, असे सोहेल कबीर सय्यद याने आम्हाला सांगितले. त्यानंतर तक्रार देण्यासाठी पोलिस ठाण्यात आलो असता, तेथे पोलिसांनी एका इसमास आणले होते. सोहेल सय्यद याने सदर इसम हाच म्हशी चरण्यासाठी घेवून जाणारा असल्याचे सांगितले. त्यामुळे अमित विलास निस्ताने यानेच माझा मुलगा विवेक गायकवाड याला म्हशीला धडकल्याच्या कारणावरून काठीने मारून ठार मारले, असे फिर्यादीत म्हटले आहे. अधिक तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक जुबेर मुजावर करीत आहेत.

रक्षाबंधन करून घराकडे निघाला होता विवेक गायकवाड
माझा मुलगा विवेक हा त्याच्या पत्नीसह गुलमोहोर रोडवर राहतो. आम्हाला भेटण्यासाठी आला होता. बहिणीकडून त्याने राखी बांधून घेतली. राखी बांधून झाल्यावर तो त्याच्या घरी जाण्याकरीता निघाला. रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास त्याचा अपघात झाला आहे, तो मृत झाला असल्याची माहिती मिळाल्याने आम्ही सर्वजण तत्काळ तोफखाना पोलिस स्टेशनला गेलो, असे विवेक याच्या आईने फिर्यादीत म्हटले आहे.

बातम्या आणखी आहेत...