आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वाहनांची मोठी गर्दी:उड्डाणपूल वाहतुकीसाठी खुला; औरंगाबाद-पुण्याच्या प्रवाशांचा वाचला अर्धा तासाचा वेळ

नगर15 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

अहमदनगर शहरातील तीन किलोमीटर अंतराचा उड्डाणपूल रविवारी सार्वजनिक वाहतुकीसाठी खुला करण्यात आला. रविवारी पहिल्याच दिवशी या उड्डाणपुलावरून जाण्यासाठी वाहनांची मोठी गर्दी दिसून आली. शनिवारी या उड्डाणपुलाचे उद्घाटन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते झाले होते. उड्डाणपूल खुला झाल्यामुळे औरंगाबादहून पुण्याकडे व पुण्याहून औरंगाबादकडे जाणाऱ्या प्रवाशांचा ३० मिनिटांचा वेळ वाचत आहे.

नगरच्या शहरातील औरंगाबाद-पुणे रस्त्यावर उभारण्यात आलेल्या स्टेट बँक चौक ते सक्कर चौक दरम्यान तीन किलोमीटर अंतराच्या उड्डाणपुलाचे लोकार्पण झाल्यानंतर शनिवारी रात्री नेत्रदीपक आतषबाजी व रोषणाई करण्यात आली होती. रविवारी सकाळीच हा उड्डाणपूल सार्वजनिक वाहतुकीसाठी खुला करण्यात आला. तब्बल ३३१ कोटी रुपये खर्च करून हा उड्डाणपूल उभारण्यात आला आहे. २२ महिन्यांत या उड्डाणपुलाचे काम पूर्ण झाले आहे.

या उड्डाणपुलाची रुंदी १९ मीटर आहे. चार पदरी हा उड्डाणपूल आहे. दरम्यान, मार्च २०१९ मध्ये या उड्डाणपुलाच्या भूमिपूजनाचा पाया रोवला गेला होता. तत्कालीन स्वर्गीय खासदार दिलीप गांधी यांच्या पुढाकारातून व सध्याचे खासदार डॉ. सुजय विखे यांच्या प्रयत्नातून हा उड्डाणपूल मार्गी लागला आहे.

वाहतूक कोंडीतून मिळाला दिलासा
उड्डाणपूल वाहतुकीसाठी खुला झाल्यामुळे औरंगाबादहून पुण्याकडे व पुण्याहून औरंगाबाद कडे जाणाऱ्या प्रवाशांचा ३० मिनिटांचा वेळ वाचत आहे. उड्डाणपूल होण्यापूर्वी स्टेट बँक चौक, कोठला, माळीवाडा बस स्थानक, स्वस्तिक चौक या भागात प्रचंड वाहतूक कोंडी होत होती, आता मात्र वाहन चालकांना थेट जाता येत आहे.

रविवारची सुट्टी आणि नगरकरांची टेस्ट ड्राईव्ह
रविवारी सकाळी उड्डाणपूल वाहतुकीसाठी खुल्या झाल्यानंतर नगरकरांनी देखील उड्डाणपुलावरून टेस्ट ड्राईव्ह घेण्यासाठी गर्दी केल्याचे दिसून आले. सकाळपासून या उड्डाणपुलावरून जाण्यासाठी वाहनांनी मोठ्या संख्येने गर्दी केली होती. प्रथमच वाहतुकीसाठी हा उड्डाणपूल खुला झाल्यामुळे रविवारच्या सुट्टीचा आनंद उड्डाणपुलाला भेट देण्यासाठी नगरकरांनी घेतला.

बातम्या आणखी आहेत...