आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विद्युत सुरक्षितता:पावसाळ्यात विद्युत सुरक्षेचे नियम पाळा;अपघात टाळा! महावितरणाचे नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन

अहमदनगर16 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

पावसाळ्यात वादळी व संततधार पाऊस किंवा पूर परिस्थिती, झाडे व फांद्या कोसळल्याने तुटलेल्या वीजतारा, विजेची उपकरणे किंवा यंत्रणेमधील शॉर्टसर्किट आदींमुळे विद्युत अपघात होण्याची शक्यता असते. नागरिकांनी सार्वजनिक व घरगुती वीजयंत्रणा, उपकरणांपासून सावध राहावे, वीज ग्राहकांनी या सूचनांचे व नियमांचे पालन करून सतर्क व सुरक्षित राहावे,असे आवाहन महावितरणच्या नाशिक परिमंडळाने केले आहे.

विजांचा कडकडाट होत असले तर सर्व विद्युत उपकरणे बंद करुन ते मूळ वीज कनेक्शनपासून बाजूला करावी. आपल्या घरातील अर्थिंग सुस्थितीत असावी आणि गरजेनुसार त्याची तपासणी करावी. जमिनीवर तुटून पडलेल्या विजतारांना स्पर्श करू नये आणि लोंबकळणाऱ्या वीज तारांपासून सावध राहावे व वीज कंपनीला त्याची माहिती द्यावी.

विद्युत उपकरणे ओल्या हाताने हाताळू नका, विद्युत वाहिनीच्याखाली किंवा जवळ कोणतेही बांधकाम करू नका, विद्युत खांब किंवा तणाव -ताराला गुरे ढोरे बांधू नका. शेतातील कुंपणात विद्युत प्रवाह सोडू नका,तात्पुरते लोंबणारे वायर वापरू नका, विजेच्या अनधिकृत वापर टाळा, विशेषत विद्युत मीटरजवळच्या जागेत पाणी झिरपून जागा ओली होत असल्यास मिटरचे मुख्य स्वीच बंद करावे व जागा बदलून घ्यावी घरातील कोळी, किटक, पाल, झुरळ, चिमण्या उबदार जागा म्हणून मीटर तसेच स्वीच बोर्डच्या आश्रयाला येतात, त्यामुळे शॉटसर्किट होऊ शकते त्यादृष्टीनेही खबरदारी घ्यावी.

नागरिकांनी सहकार्य करण्याचे आवाहन

मुसळधार पाऊस आणि वादळी वारा यामुळे झाडाच्या मोठ्या फांद्या तुटून वीजतारांवर पडतात. तसेच झाडे पडल्याने वीजखांब वाकला जातो. परिणामी वीजतारा तुटण्याचे प्रकार घडतात. त्यात वीजप्रवाह असण्याची शक्यता असल्याने अशा तुटलेल्या, लोंबकळणाऱ्या वीजतारांपासून सावध राहावे. या तारांना हात लावण्याचा किंवा हटवि्याचा प्रयत्न करू नये, दरम्यान, पूर किंवा अतिवृष्टीमुळे कोणत्याही क्षणी प्रतिकूल स्थिती, धोका निर्माण होण्याची शक्यता असल्याने खबरदारीचा उपाय म्हणून रोहित्रांचा वीजपुरवठा बंद ठेवण्यात येतो. अशा स्थितीत नागरिकांनी सहकार्य करावे,असे आवाहन महावितरणने केले आहे.

येथे नोंदवा तक्रार

वीजसेवेच्या तक्रारींसह अतिवृष्टी किंवा वादळामुळे वीजपुरवठ्यात तांत्रिक बिघाड होऊन दुर्घटना होण्याची शक्यता आहे, अशा तक्रार देण्यासाठी शहरी व ग्रामीण भागातील वीजग्राहकांसाठी 24 तास सुरु असणाऱ्या मध्यवर्ती ग्राहक सेवा केंद्राचे 192 किंवा 1800-102-3435 किंवा 1800-133-3435हे तीन टोल फ्री क्रमांक उपलब्ध आहेत. यासह महावितरणचे अॅप, संकेतस्थळ तसेच नोंदणीकृत मोबाईलवरून महावितरणच्या 022-41078500 या क्रमांकावर मिस्ड कॉल दिल्यास किंवा NOPOWER (स्पेस देऊन ) ग्राहक क्रमांक टाकून हा एसएमएस 9930399303 या क्रमांकावर पाठवल्यास तक्रार नोंदवल्या जाईल.

बातम्या आणखी आहेत...