आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

दिव्य मराठी विशेष:99 वर्षांत प्रथमच साईबाबांचे लक्ष्मीपूजन भाविकांविना, कोरोनात असे झाले लक्ष्मीपूजन

नवनाथ दिघे | शिर्डी3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • मूर्तीवर 3.50 कोटींची आभूषणे, हिरेजडित रत्नमुकुटासह सुवर्णजडित शाल, फुलांची सजावट

विश्वाला श्रद्धा व सबुरीसोबत सर्वधर्मसमभावाची शिकवण देणाऱ्या साईबाबांच्या ऐश्वर्यसंपन्न धनलक्ष्मीचे पूजन शनिवारी ९९ वर्षांनंतर प्रथमच भाविकांच्या गैरहजेरीत झाले. या वेळी साईबाबांना सुमारे साडेतीन कोटींची आभूषणे घालण्यात आली होती. त्यात हिरेजडित रत्नांचा मुकुट व सुवर्णजडित शालीचा समावेश होता. साई मंदिर व परिसर रोषणाई व विविधरंगी फुलांच्या सजावटीने फुलून गेला. कोरोनामुळे मंदिर बंद असल्याने दरवर्षीप्रमाणे लक्ष्मीपूजनानंतर देश- विदेशातील भाविकांचा ओघ यंदा नाही. स्थानिक शिर्डीकरांनी कळसाचे दर्शन घेऊन दीपावली साजरी केली. साईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी कान्हुराज बगाटे यांच्या हस्ते सायंकाळी ५ वाजता साईबाबांचे लक्ष्मीपूजन करण्यात आले. दीपावलीचे चारही दिवस सुगंधी उटणे लावून साईबाबांच्या समाधीस व मूर्तीस मंगलस्नान घालण्यात येत आहे. नैवेद्यात लाडू, चकली, चिवडा, करंजी असा फराळ होता.

कोरोनात असे झाले लक्ष्मीपूजन

समाधी चौथऱ्यावर सायंकाळी साडेचार वाजता रोषणाई केलेला चौरंग, त्यावर नक्षीदार सुवर्णकलश, त्यात पारंपरिक चांदीची नाणी, चांदीच्या कमळात उभी असलेली लक्ष्मी व साईबाबांची मूर्ती मांडून पूजा करण्यात आली. पूजेआधी कार्यकारी अधिकारी कान्हुराज बगाटे यांच्या हस्ते साई समाधी मंदिराच्या तळघरातील लक्ष्मीचे पूजन करण्यात आले. यानंतर पाच वाजता लक्ष्मीपूजनास सुरुवात करण्यात आली.

साडेचार लाखांच्या देणगीतून सजावट

एका साईभक्ताने दिलेल्या साडेचार लाख रुपयांच्या देणगीतून मंदिर व परिसरात विविधरंगी फुलांची सजावट करण्यात आल्याने सर्व परिसर फुलांच्या सुगंधाने व रोषणाईने झळाळून निघाला होता. कळसावरील रोषणाई शिर्डीकरांचे लक्ष वेधून घेत होती.

भाविक नसल्याने लेंडीबागेत दीपोत्सव नाही :

साई मंदिरातील लक्ष्मीपूजनाला ९९ वर्षांची परंपरा आहे. साई संस्थानची निर्मिती झाल्यानंतर लक्ष्मीपूजनास सुरुवात झाली. लक्ष्मीपूजनानंतर दरवर्षी मंदिर परिसरातील लेंडीबागेत लाखो भाविक दिवे लावून दीपोत्सव साजरा करतात. मात्र, यंदा कोरोनाच्या संकटामुळे मंदिरात भाविकांना प्रवेश नसल्याने लेंडीबागेत दीपोत्सव झाला नाही. गेल्या १०१ वर्षांत साईबाबांची महती देश-विदेशात सर्वदूर पोहोचली असल्याने भाविकांच्या संख्येसाठी हे देवस्थान देशातील क्रमांक एकचे तर दानामध्ये क्रमांक दोनचे ठरले आहे.

बातम्या आणखी आहेत...