आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आगीची तपासणी सुरू:फॉरेन्सिक विभागाकडून आगीची तपासणी सुरू; जिल्हा बँक : नुकसानीचा आकडा गुलदस्त्यातच, विद्युत निरीक्षकांकडून परीक्षण, पंचनाम्यानंतर पोलिसात घटनेची नोंद

नगर4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

जिल्हा बँकेच्या मुख्य इमारतीमधील लेखा परीक्षण विभागाला लागलेल्या आगीचा तपास सुरू करण्यात आला आहे. कोतवाली पोलिसांनी शनिवारी सकाळी पंचनामा करुन आगीच्या घटनेची नोंद केली आहे. तर उर्जा विभागाच्या विद्युत निरीक्षकांकडून विद्युत व्यवस्थेची तांत्रिक पाहणी करण्यात आली. त्यानंतर दुपारी ‘फॉरेन्सिक’ विभागाच्या पथकाने बँकेत जाऊन घटनास्थळी नमुने घेत तपासणी सुरू केली आहे. दरम्यान, आगीत किती नुकसान झाले याचा आकडा अद्यापही समोर आलेला नाही.

शुक्रवारी (१ एप्रिल) सायंकाळी बँकतील तिसऱ्या मजल्यावर असलेल्या लेखा परीक्षण विभागात एका फॅनजवळ स्पार्किंग होऊन आग लागली. सीसीटीव्ही फुटेजमध्ये ही घटना कैद झाली आहे. आगीत लेखा परीक्षण विभागातील सर्व कागदपत्रे व साहित्य जळून खाक झाले आहे. यात बँकेचे लाखो रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.

कोतवाली पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक संपत शिंदे यांच्यासह पथकाने शनिवारी सकाळी घटनास्थळी पाहणी करुन पंचनामा केला. यात कागदपत्रे व फर्निचर साहित्याच्या नुकसानीची नोंद करण्यात आली आहे. विमा कंपनीकडून तपासणी झाल्यानंतर किती रुपयांचे नुकसान झाले, याची माहिती समोर येईल, असे पोलिसांकडून सांगण्यात आले.

पोलिसांसह विद्युत निरीक्षकांकडूनही घटनास्थळी पाहणी करण्यात आली. आग कशामुळे लागली याचा तांत्रिक अहवाल त्यांच्याकडून दिला जाणार आहे. तसेच फॉरेन्सिक विभागाकडूनही नमुने तपासणीसाठी घेण्यात आले आहेत. सोमवारी हे नमुने प्रयोगशाळेत पाठवले जाणार आहेत.

बातम्या आणखी आहेत...