आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सोयीस्कर दुर्लक्ष:नाल्यावरील अतिक्रमणे हटविण्याचा विसर

नगर4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

शहरातून वाहणाऱ्या सीना नदीसह ओढे नाल्यावरील अतिक्रमणाची माहिती महापालिकेने संकलित केली आहे. तीन टप्प्यात कारवाई करून प्रवाह मोकळे करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले होते. मात्र, महापालिकेकडून अद्याप कोणतीही कारवाई सुरू झालेली नाही. महापालिकेला या कारवाईचा विसर पडल्याचे चित्र आहे. मनपाने सध्या केलेल्या सर्वेक्षणानुसार शहरातून वाहणारी सीना नदी व इतर ओढे नाले यांची संख्या ४१ आढळली आहे. याची मनपा हद्दीतील एकूण लांबी ९४.८५ किमी. आहे, मात्र त्यावर ८.२३ किमीवर अतिक्रमणे आढळली आहेत.

नागरिक कृती मंचचे अध्यक्ष शशिकांत चंगेडे याबाबत पाठपुरावा करत आहेत. जिल्हाधिकाऱ्यांकडे आपत्ती व्यवस्थापन कायद्याद्वारे शहरातील सीना नदीसह ओढे, नाले यावरील अतिक्रमणासंदर्भात त्यांनी तक्रार केली आहे. जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी बैठक घेऊन मनपाला ९० दिवसात अतिक्रमणे हटवण्यासंदर्भात आराखडा सादर करण्याचे आदेश दिले होते.यासंदर्भात माहिती संकलित करण्यासाठी व रूपरेषा ठरवण्यासाठी मनपा आयुक्त पंकज जावळे, चंगेडे, नगररचनाकार राम चारठाणकर, अतिक्रमण विभागाचे प्रमुख रोहिदास सातपुते यांच्या उपस्थितीत बैठकही झाली.

सीना नदीसह ओढे नाले यावर भूमिगत पाईप टाकून बुजवलेली लांबी एकूण ८.२३ किमी आहे. यापैकी मोकळ्या जागेवरील लांबी ४.९१ किमी तर बांधकामे झालेली लांबी ३.३२ किमी आहे. पहिल्या टप्प्यात मोकळ्या जागेवरील अतिक्रमणे काढली जातील, त्यानंतर झालेल्या अतिक्रमणांचा व बांधकामांचा शोध घेतला जाईल, त्यानंतर विधिज्ञांचा सल्ला घेऊन अतिक्रमणे काढण्याची मोहीम राबवली जाईल, असे नगररचनाकार चारठाणकर यांनी सांगितले होते. मात्र, अद्यापही पहिल्या टप्प्यातील कारवाई सुरू झालेली नाही.

बातम्या आणखी आहेत...