आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराशहरात होत असलेल्या उड्डाणपुलासाठी माजी आमदार स्व. अनिलभय्या राठोड व माजी खासदार स्व. दिलीप गांधी या दोघांचेही योगदान आहे. या पुलासाठी योगदान देणारांची नावे घेताना त्या दिवशी अनिलभय्या यांचे नाव घेण्यास मी विसरलो. त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो, असे स्पष्टीकरण खासदार डॉ. सुजय विखे यांनी दिले. दरम्यान, उड्डाणपूल हे सर्वांचेच श्रेय आहे, असे सांगत त्यांनी सुरू असलेल्या श्रेयवादावर पडदा टाकला.
विखे यांनी शहराचे आमदार संग्राम जगताप यांच्यासमवेत उड्डाणपुलाची पाहणी केली होती. त्यावेळी त्यांनी या पुलाच्या कामाचे श्रेय पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, आमदार जगताप व माजी खासदार गांधी यांना दिले होते. यावेळी राठोड यांचे नाव विखेंनी न घेतल्याने शिवसेनेतील ठाकरे व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाने त्यांच्यावर टीका केली होती. अनिलभय्या राठोड यांच्यामुळे तुम्ही खासदार झाले आहात, पण तुम्ही त्यांचे नाव विसरले असले तरी आम्ही विसरणार नाही, असा सूचक इशारा ठाकरे सेनेने सोशल मीडियातून दिला होता व त्यानंतर दुसऱ्याच दिवशी उड्डाणपुलावर जाऊन पुलाचे नारळ वाढवून उद्घाटन केले होते. यापार्श्वभूमीवर विखे यांनी पत्रकारांसमोर भूमिका मांडताना स्व. राठोड यांचे नाव विसरल्याचे कबूल करून त्याबद्दल दिलगिरी व्यक्त केली. उड्डाणपुलाचे काम होण्यात राठोड यांचेही मोठे योगदान आहे. त्यांनीही या पुलासाठी त्याग केलेला आहे, असे स्पष्ट केले. माझ्या राजकीय वाटचालीत लोकसभा निवडणुकीवेळी स्व. राठोड माझ्या पाठीशी उभे होते. कामाच्या गडबडीत मी त्यांचे नाव घेण्याचे विसरलो. त्यांना मी विसरणार नाही असेही ते म्हणाले.
उड्डाणपुलाची अनेकजण पाहणी करीत असल्याने ते चांगले आहे. कारण, आता पुलाचे काम संपले आहे. त्याचे श्रेय सर्वांना द्यायला हवे. अनिलभय्या राठोड व दिलीप गांधी यांच्यासह सर्व नगरकर, सर्वपक्षीयांना, सर्व नगरसेवकांनाही श्रेय आहे. या श्रेयनामावलीत मी शेवटी आहे, शेवटचे श्रेय माझे आहे, असे म्हणत विखे यांनी श्रेयवादावर पडदा टाकला.
उड्डाणपुलाला अहमदनगर शहराचेच नाव
केंद्र सरकारच्या निधीतून होणारे रस्ते व पुलांना नाव देण्याची प्रथा नाही व तशी नॅशनल अॅथॉरिटीकडून परवानगीही नसते. त्यामुळे नगरच्या उड्डाणपुलाला कोणाचे नाव द्यायचे असेल तर केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरींकडे लेखी मागणी करावी लागेल व त्यावर अंतिम निर्णय पंतप्रधान नरेंद्र मोदी घेतील. हा उड्डाणपूल अहमदनगर शहरात होत असल्याने या पुलाला अहमदनगर उड्डाणपूल असे जिल्ह्याचे नाव देण्यात काहीच वाईट नाही. पण पुलाचे नाव काय असावे, याबाबत माझे कशाला समर्थनही नाही व विरोधही नाही, असेही विखे यांनी स्पष्ट केले. या पुलाला ८६ खांब असल्याने या सर्व खांबांना महापुरुषांची नावे दिली, तरी माझी हरकत नाही, असेही ते म्हणाले.
उड्डाणपुलावर सीसीटिव्ही
पुलाच्या खांबांवरील शिवचरित्राचे तसेच मार्केट यार्ड चौकातील खांबांना वडाच्या झाडाचे रुप देण्याचे काम प्रगतीपथावर आहे. चांदणी चौकात यापुलाखालील अॅम्पी थिएटर व अन्य कामे लवकरच सुरू होतील. एक कोटी खर्चून उड्डाणपुलावर सीसीटिव्ही कॅमेरे लावणार असल्याचेही विखे यांनी सांगितले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.