आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वीजप्रश्नी भाजपचा ठिय्या:आंदोलनात गळफासाचा फार्स, अन् 3 मिनिटे ‘जीव टांगणीला’, माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे यांचा खुर्चीवरून पाय सटकला; दैव बलवत्तर म्हणून बचावले

नगर7 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

मंगळवार. वेळ सायंकाळी ५ ची. स्थळ : नेवासा बसस्थानकामागील महावितरण कंपनीचे कार्यालय. “कृषिपंपांची वीज बिल वसुली तत्काळ थांबवण्यात यावी’ या मागणीसाठी भाजपचे माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्ते ठिय्या देऊन बसलेले. तहसीलदार, वितरण कंपनीचे अधिकारी यांच्याशी चर्चा सुरू.. तोडगा काही केल्या निघत नव्हता..

‘आता आत्महत्येशिवाय पर्याय नाही,’ असं म्हणत सोबत आणलेला दोर मुरकुटे यांनी सीलिंगच्या हुकाला अडकवला. एक खुर्ची पायाखाली घेतली. फासही गळ्यात अडकवला...पण नाटक करता करता खुर्चीवरून पाय सटकला आणि चक्क फास आवळला गेला. जीव गुदमरू लागला. कार्यकर्ते धावले आणि त्यांनी सुटका केली.. तब्बल अडीच मिनिटे श्वास कोंडलेले थरारनाट्य पाहून उपस्थितांचेही धाबे दणाणले होते. नंतर अधिकाऱ्यांसह सर्वांनीच नि:श्वास सोडला.

महावितरणने कृषिपंपाची वीज ताेडण्याची मोहीम सुरू केली आहे. ही मोहीम थांबवावी या मागणीसाठी माजी आमदार मुरकुटे यांनी नेवासे तहसीलमध्ये जाऊन दुपारी दोन वाजता आंदोलन करत तहसीलदार रुपेशकुमार सुराणा यांना आपल्या मागण्यांचे निवेदन दिले त्यानंतर कार्यकर्त्यांच्या गराड्यातच त्यांनी थेट महावितरण कंपनीचे कार्यालय गाठले. दुपारी अडीचच्या सुमारास आमदार मुरकुटे, विठ्ठलराव लंघे, निवृत्ती जावळे, भाऊसाहेब फुलारी, विशाल धनगर, रमेश घोरपडे आदी कार्यकर्त्यांनी तिथेच ठिय्या आंदोलन सुरू केले.

वितरण कंपनीचे नेवासा येथील अभियंता शरद चेचर, तहसीलदार सुराणा व अन्य अधिकाऱ्यांसोबत चर्चा सुरू झाली. परंतु आमदार मुरकुटे शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती डबघाईला आल्याचे कारण सांगून बिलाच्या वसुलीसाठी किमान महिनाभराचा तरी वेळ द्यावा आणि तोपर्यंत तीन हजार रुपये जमा करून घ्यावेत, अशी मागणी करत होते. त्याला कोणताच प्रतिसाद मिळत नाही, हे पाहताच मुरकुटे यांनी आधीच बरोबर आणलेला एक दोर घेऊन तो कार्यालयाचा सिलिंगला अडकवला आणि एक प्लास्टिकची खुर्ची घेऊन त्यावर उभे राहिले. मुरकुटे खरोखरच गळफास घेतील असे कोणालाच वाटले नाही.

त्यामुळे त्यांची ही कृती कोणीच फारशी गांभीर्याने घेतली नाही. अधिकारीवर्ग कोपऱ्यामध्ये चर्चा करत होता आणि तेवढ्यात मुरकुटे यांनी गळफास अडकवून घेतला. परंतु इथेच काहीतरी गडबड झाली आणि खुर्चीवरून त्यांचा पाय सटकला आणि मग काय? गळफास घेऊन लटकलेल्या अवस्थेत मुरकुटे यांना पाहून कार्यकर्त्यांनी त्यांच्याकडे धाव घेतली. काहींनी त्यांना खालून पायाला मिठी मारली. तर काही कार्यकर्ते त्यांच्या गळ्यातून फाशीचा दोर काढण्याचा प्रयत्न करीत होते.

या तीन मिनिटांत मुरकुटे यांच्या डोळ्यापुढे कदाचित अंधारी पसरली असावी. जेंव्हा गळ्यातून फाशीचा दोर निघाला, तेंव्हा त्यांना खुर्चीवर बसवून पाणी पाजण्यात आले. अधिकारीही वरमले. शेतकऱ्यांना शेतीसाठी आणि पिण्यासाठी पाणी देण्याकरिता एक तास वीज सुरू करण्याचे आश्वासन देऊन आंदोलनाचा समारोप केला.

मेल्यानंतरच विचार करणार का ?
इतर तालुक्यांच्या मानाने नेवासे येथे तीव्रतेने वीज तोडणी सुरू आहे. मंत्र्यांसोबत व अधिकाऱ्यांशी चर्चा करूनही मार्ग निघत नसल्याने मी हा पर्याय निवडला. शासन शेतकऱ्यांचा मेल्यानंतरच विचार करणार आहे का ? - बाळासाहेब मुरकुटे, माजी आमदार.

...हा तर निव्वळ राजकीय स्टंट
मुरकुटेंनी हा राजकीय स्टंट केला असून ही निव्वळ नौटंकी आहे. हे आमदार असताना दर दोन महिन्यांनी वीज कनेक्शन कट केली जात. मार्चअखेर वसुली केली जात असताना हे मूग गिळून गप्प होते. - विठ्ठल पिसे, शेतकरी, सलबतपूर, ता. नेवासे

बातम्या आणखी आहेत...