आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराबालविकास प्रकल्प कार्यालयांचा कारभार गुणवत्तापूर्ण व पारदर्शक नसून पेसा कायद्याचा चुकीचा अर्थ काढून स्थानिक आदिवासी महिलांना रोजगारापासून वंचित ठेवल्याबद्दल माजी आमदार वैभव पिचड यांनी खंत व्यक्त केली. सहा महिन्यांपासून आदिवासी भागांतील लव्हाळवाडी व पाचनई अंगणवाडी बंद असून बालकांच्या आरोग्याकडे दुर्लक्ष होत असल्याबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली. तसेच अमृत व पूरक आहार नियोजनात त्रुटी बालविकास प्रकल्पाचे वरिष्ठ जिल्हा कार्यक्रम अधिकारी मनोज ससे यांच्या निदर्शनास आणून दिल्या.
वैभव पिचड यांनी राजूर येथील प्रकल्प कार्यालयाच्या आनागोंदी कारभाराविरोधात वरिष्ठ जिल्हा कार्यक्रम अधिकारी मनोज ससे यांच्याकडे समक्ष भेटून तक्रार केली. खडकी खुर्द, धामनवन व इतर दोन अंगणवाडी सेविका भरतीबाबत सरपंच व ग्रामस्थांना विश्वासात न घेताच आर्थिक व्यवहारातून ग्रामसेवकास हाताशी धरून गुणवत्तेत नसताना संधी दिली. अतितीव्र कुपोषित बालकांची भरती प्रक्रिया सदोष असून आरोग्य विभाग व प्रकल्प कार्यालयाच्या धामणवन व खडकी खुर्द येथील आकडेवारीत तफावत आढळून येते. यावर आदिवासींचे आक्षेप घेत प्रक्रिया स्थगितीचा अर्ज दिला.
लव्हाळवाडी व पाचनई अंगणवाडी त्वरित सुरू न झाल्यास पेसा सरपंच परिषद याविरोधात वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे तक्रार करेल. बालकांच्या कुपोषणाचा प्रश्न सुटला नाही, तर तीव्र आंदोलन करू, बालविकास प्रकल्प कार्यालयाच्या कारभारात सुधारणा करावी, अशी अपेक्षा व्यक्त केली.
यावेळी त्यांच्यासमवेत भरत घाणे, राम तळेकर, बाळासाहेब सावंत, डॉ. अनंत घाणे, गंगाराम धिंदळे, सरपंच श्रावणा भांगरे, नवनाथ करवंदे, रेश्मा भांगरे उपस्थित होते.जिल्हा बाल विकास प्रकल्पधिकारी मनोज ससे, अकोल्याचे बालविकास प्रकल्पाधिकारी हरिभाऊ हाके व राजूर येथील भारती सातळकर यांनी आमदार वैभव पिचड यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांवर उत्तरे दिली.
शासकीय विभागांमध्ये समन्वयाचा अभाव उघडकीस
राजूर प्रकल्पांतर्गत बालक तपासणीसाठी ३ फिरती पथके असून प्रकल्प कार्यालय व फिरती पथके यांच्यात समन्वय नाही. प्रकल्प कार्यालयांतर्गत अतितीव्र ७४ कुपोषित, तीव्र ५५१ कुपोषित तर तालुका आरोग्य विभागाचा ५७ अतितीव्र व तीव्र ३५० कुपोषित बालके असल्याने दोन्ही विभागांतर्गत समन्वय नसल्याचे दिसून आले. प्रकल्प कार्यालयात राष्ट्रपती, पंतप्रधान, मुख्यमंत्री यांच्या प्रतिमा नसल्याबाबत प्रश्न उपस्थित झाले. तसेच अमृत आहार, तीव्र कुपोषित प्रश्न उपस्थित केल्यावर साताळकर यांनी अती तीव्र कुपोषित यांच्या कार्यालयात सोमवारी फलक व राष्ट्रपुरुषांच्या प्रतिमा लावण्यात येतील, असे आश्वासन दिले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.