आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करानगर शहरात धूम स्टाईल मंगळसूत्र चोरांनी पुन्हा डोके वर काढले आहे. गेल्या तीन-चार दिवसांपासून घटना वाढत असताना रविवारी चोरट्यांनी उच्छाद मांडला. एकाच दिवशी चार ठिकाणी महिलांच्या गळ्यातील दागिने चोरट्यांनी पळवले. सकाळी व सायंकाळी सावेडी उपनगरात तीन, तर नालेगाव परिसरात रात्री एक घटना घडली. यासंदर्भात तोफखाना आणि कोतवाली पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल झाले आहेत. दरम्यान, या घटनांमुळे महिला वर्गात भीतीचे वातावरण आहे.
रविवारी सकाळी शोभा सुधाकर कल्हापुरे (वय ५०, रा. शिवनगर, जुना पिंपळगाव रोड, सावेडी) व त्यांचा मुलगा दुचाकीवर एकविरा चौकाकडून तपोवन रोडकडे जात असताना साहीब बेकरीसमोर दुचाकीवर आलेल्या चोरट्याने शोभा यांच्या गळ्यातील दोन तोळ्याचे मिनी गंठण ओरबडून धूम ठोकली. तर पुष्पावती पंडीतराव ठमके (वय ५९, रा. सोनानगर, सावेडी) या त्यांच्या नातवाला घेऊन सोनानगर पार्क पासून पाटील चौकाकडे जात असताना सायंकाळी सव्वा सात वाजण्याच्या सुमारास त्यांच्या गळ्यातील दोन तोळ्याचे मिनी गंठण चोरट्यांनी ओरबाडले.
पुष्पावती यांचा नातू सायकलसह रस्त्यावर पडला. त्याला उचलण्यासाठी त्या खाली वाकल्या असता चोरट्याने त्यांच्या गळ्यातील गंठण हिसकावून पळ काढला. याच चोरट्यांनी सायंकाळी साडेसातच्या सुमारास लक्ष्मी उद्यानजवळ वनिता सुभाष जोशी यांच्या गळ्यातील एक तोळ्याची सोन्याची चेन ओढली. वनिता यांनी प्रतिकार केल्याने चेन तुटून काही भाग चोरट्याने पळवला.
रविवारी रात्री नऊच्या सुमारास नालेगाव परिसरातील कुंभारगल्लीमध्ये असलेल्या ईशान अपार्टमेंटमध्ये घुसून महिलेच्या गळ्यातील एक तोळ्याचे मंगळसूत्र चोरट्यांनी लंपास केले. यासंदर्भात संपदा संजय साठे (वय ४२ रा. कुंभारगल्ली, नालेगाव) यांनी कोतवाली पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. एकाच दिवसात घडलेल्या या चार घटनांमुळे महिला वर्गात दहशतीचे वातावरण आहे. पोलिसांकडून चोरट्यांचा बंदोबस्त होत नसल्याने त्यांचा धुमाकूळ सुरूच आहे. पोलिसांसमोर या चार घटनांच्या तपासाचे आव्हान उभे ठाकले आहे.
पत्ता विचारण्यासाठी इमारतीत घुसला
ना येथील साठे व त्यांच्या अपार्टमेंटमध्ये राहणार्या त्यांच्या मैत्रीण सुनीता खिलारी या बाजारात गेल्या होत्या. त्या रात्री नऊ वाजता घरी आल्या. त्यांनी त्यांची दुचाकी अपार्टमेंटच्या पार्किंगमध्ये पार्क केली व पायर्या चढून फ्लॅटमध्ये जात असताना एक अनोळखी व्यक्ती तेथे आला. येथे त्रिवेदी राहतात काय? अशी विचारणा केली व सुनीता यांच्या गळ्यातील मंगळसूत्र हिसकावून नेले. सुनीता यांनी प्रतिकार केला असता त्यांना ढकलून चोरट्याने धूम ठोकली.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.