आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराकेंद्र शासनाच्या राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत महापालिकेच्या वतीने नगर शहरात तब्बल १२ आरोग्यवर्धिनी केंद्र करण्यात येत आहे. पंधराव्या वित्त आयोगाच्या सुमारे साडेसात कोटी रुपयांच्या निधीतून उभारण्यात येणाऱ्या या आरोग्य केंद्राद्वारे नागरिकांना मोफत तपासणी, उपचार व औषधे दिली जाणार आहेत. काही प्राथमिक रक्त तपासण्याही मोफत केल्या जाणार आहेत. येत्या जानेवारी अखेरपर्यंत ही केंद्र कार्यरत करण्यात येणार आहेत.
सध्या बाळासाहेब देशपांडे रुग्णालयास महापालिकेकडून सात आरोग्य केंद्रावर सेवा दिली जात आहे. आता आरोग्यवर्धिनी केंद्राच्या माध्यमातून आणखी १२ उपकेंद्रांवर सर्वसामान्य नागरिकांना मोफत आरोग्य सेवा सुरू होणार आहे. त्यासाठी प्रशासनाने जागा निश्चित केल्या आहेत. मनपाच्या अस्तित्वात असलेल्या इमारतीमध्ये नूतनीकरण करून त्यात फर्निचर व इतर साहित्य उपलब्ध केले जाणार आहे.
सुमारे १५ ते २० हजार लोकसंख्येमागे एक यानुसार शहरात झोपडपट्टी, चाळ, गरीब - सामान्य लोकवस्ती असलेल्या भागात सेवा उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न या माध्यमातून केला जात आहे. आरोग्य तपासणी व उपचार यासह राष्ट्रीय आरोग्य कार्यक्रमही या केंद्रांवर राबविण्यात येणार आहेत. येत्या पाच वर्षांसाठी सुमारे साडेसात कोटी रुपये खर्चून ही सेवा दिली जाणार आहे.
आरोग्यवर्धिनी केंद्रात ‘डे केअर' सेंटर
महापालिकेकडून उभारण्यात येणाऱ्या केंद्रात बाह्यरुग्ण तपासणी (ओपीडी), उपचार, औषधे, प्राथमिक रक्त तपासणी केली जाणार आहे. एखाद्या रुग्णास प्राथमिक उपचार करून दिवसभर डॉक्टरांच्या निगराणीखाली ठेवण्यासाठी केंद्रात 'डे केअर' सेंटर सुरू केले जाणार असल्याचे आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले.
चांगल्या दर्जाची आरोग्य सेवा उपलब्ध होणार
शहरी भागातील नागरिकांना आरोग्य सुविधा मिळाव्यात, यासाठी राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत हा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. सामान्य नागरिकांना मोफत व चांगल्या दर्जाच्या सेवा या आरोग्यवर्धिनी केंद्राच्या माध्यमातून उपलब्ध होणार आहेत. लवकरच ही केंद्रे सुरू होऊन नागरिकांना सेवा मिळेल. '' -डॉ. पंकज जावळे, आयुक्त, नगर महापालिका.
नूतनीकरणासाठी प्रत्येकी २१.५० लाख रुपये
मनपाच्या उपलब्ध जागेत आरोग्यवर्धिनी केंद्राच्या उभारणीसाठी प्रत्येकी २१.५० लाख रुपयांचा खर्च प्रस्तावित आहे. तसेच साहित्य व फर्निचरसाठी प्रत्येक केंद्राला २ लाख, संगणकीकरण, इंटरनेट यासाठी प्रत्येक केंद्राला १ लाख, औषधांसाठी एका केंद्राला दरवर्षी १२ लाख, तसेच देखभाल, दुरुस्तीसाठी एका केंद्राला दरवर्षी १ लाख यानुसार अनुदान व निधी उपलब्ध करुन देण्यात येणार आहे.
समितीमार्फत नियुक्त्या
या प्रत्येक आरोग्यवर्धिनी केंद्रावर एक एमबीबीएस डॉक्टर, एक स्टाफ नर्स, एक बहुउद्देशीय कर्मचारी, एक सहाय्यक कर्मचारी, एक सुरक्षा रक्षक अशा पाच जणांना नियुक्त केले जाणार आहे. जिल्हास्तरीय समितीमार्फत या नियुक्त्या केल्या जाणार आहेत. त्यांच्या पगार व मानधनाचा खर्च योजनेतून केला जाणार आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.