आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आरोग्य:130 विद्यार्थ्यांवर मोफत हृदय शस्त्रक्रिया, तर 47 जणांनी प्रथमच ऐकला आवाज; 63 पथकामार्फत तपासणी, वर्षभरात झाले 3 कोटी खर्च

नगरएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • ० ते १८ वयोगटातील ४ लाख ६१ विद्यार्थ्यांची तपासणी

शुन्य ते अठरा वर्षे वयोगटातील बालकांसह ४ लाख ६१ हजार शालेय विद्यार्थ्यांची वर्षभरात आरोग्य तपासणी करण्यात आली. या तपासणीत आवश्यकतेनुसार तब्बल १३० विद्यार्थ्यांवर हृदयाच्या शस्त्रक्रिया करून नवसंजीवनी दिली. तर जन्मजात बहिरेपणा असलेल्या ४७ विद्यार्थ्यांना कॉक्लियर इम्प्लांट शस्त्रक्रियेनंतर प्रथमच आवाज ऐकता आला.

राष्ट्रीय बालस्वास्थ्य कार्यक्रमांतर्गत या शस्त्रक्रिया करण्यात आल्या आहेत. जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण विभागाकडील नोंदीनुसार जिल्ह्यात शुन्य ते सहा वयोगटातील बालकांची संख्या तब्बल ३ लाख ३७ हजार आहे. ज्या बालकांना शस्त्रक्रियेची आवश्यकता आहे, अशा बालकांच्या जिल्हा रूग्णालय व एनएनबीटी इगतपुरी, औरंगाबाद, कोकिळाबेन धीरूबाई अंबानी हॉस्पिटल आदी ठिकाणी शस्त्रक्रिया करण्यात येत आहेत. शुन्य ते १८ वयोगटातील आजारी शालेय विद्यार्थ्यांची नोंद राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत राष्ट्रीय बालस्वास्थ्य कार्यक्रम समन्वयकांकडे आहे. आता एप्रिल २०२२ पासून पुन्हा शालेय स्तरावर विद्यार्थ्यांच्या तपासणीची मोहिम हाती घेण्यात आली आहे.

कॉक्लियर इम्प्लांट शस्त्रक्रियेचा खर्च ५ ते ८ लाख; शालेय स्तरावर विद्यार्थ्यांची पुन्हा तपासणी

जुळ्या बहिणी बोलू लागल्या
आई-वडील मूकबधिर होते, त्यांना जुळ्या मुली झाल्या त्या देखील जन्मजात कर्णबधीर असल्याने त्यांना ऐकता व बोलता येत नव्हते. शस्त्रक्रिया झाल्यानंतर आता त्या दोघीही ऐकत आहेत व ऐकून बोलायचाही प्रयत्न करत आहेत. त्याचा विशेष आनंद होतो आहे.''
नीलेश करांडे, दरेवाडी. नातेवाईक.

२० हॉस्पिटलमध्ये शस्त्रक्रिया
ज्या शस्त्रक्रिया महात्मा फुले योजनेंतर्गत बसत नाहीत, त्या शस्त्रक्रिया बाल स्वास्थ्य कार्यक्रमांतर्गत पॅनेलवरील २० हॉस्पिटलमध्ये केल्या जातात. जन्मजात कर्णबधीर असलेल्या ४७ बालकांनी शस्त्रक्रियेनंतर प्रथमच आवाज ऐकला हे यश आहे.''
विजय दळवी, कार्यक्रम समन्वयक, स्वास्थ्य मिशन

दिव्य मराठी एक्सपर्ट व्ह्यू
मनोज ससे, उपमुख्यकार्यकारी अधिकारी, महिला व बालकल्याण.
गरज असेल तेव्हाच शस्त्रक्रिया

बालकांच्या आरोग्य तपासणीनंतर औषधोपचार केला जातो. आवश्यक असेल तरच शस्त्रक्रियेसाठी पाठवले जाते. शुन्य ते सहा वयोगटातील बालकांची आरोग्य पथक व अंगणवाडी सेविकांमार्फत नियमीत चाचणी घेऊन नोंद ठेवली जाते.

कोणत्या आजारांवर उपचार ?
कॅन्सर, किडणी संबंधित विकार, जन्मजात बहिरेपणा या दुर्धर आजारांसह तिरळेपणा, अस्थिव्यंग, ओठ दुभंगणे आदी ११ प्रकारच्या आजारांवर उपचार केले.

वर्षभरात उपचारांवर खर्च किती ?
एकट्या नगर जिल्ह्यात दुर्धर आजारावरील उपचारासाठी तब्बल ३ कोटींचा खर्च झाला. या शस्त्रक्रिया महागड्या असल्याने विद्यार्थ्यांना लाभ होतो.

उपचार खर्च कोण करते ?
विद्यार्थी उपचारासाठी ६० टक्के केंद्र व ४० टक्के खर्च राज्य सरकार करते, अशी माहिती हेल्थ मिशनच्या जिल्हा समन्वयकांनी दिली.