आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:कठोरा ग्रा.पं ने साकारली सीताफळाची बाग;पहिल्याच वर्षी मिळाले ९१ हजारांचे उत्पन्न

धनराज ससाणे | शेगाव19 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

तालुक्यातील कठोरा ग्रामपंचायतीने महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेतून २०१९ ते २०२२ या कालावधीत बिहार पॅटर्न माध्यमातून गावातील पडीक व काटेरी झाडांच्या सात एकरात एक हजार सीताफळ वृक्षांची लागवड केली. तीन वर्षात संगोपन करून सीताफळ बागेचे नंदनवन तयार केले. या डेरेदार बागेतील सीताफळ वृक्षास फळे लागले असून पहिल्याच वर्षी लिलावाच्या माध्यमातून ९१ हजाराचे उत्पन्न मिळाले आहे. गावाच्या समृध्दीचा उपक्रम राबवून कठोरा ग्रामपंचायतीने इतर ग्रामपंचायती समोर आदर्श ठेवला आहे.

या सोबतच गावातील जवळपास चार हजार मजुरांना तीन वर्ष काम मिळाले आहे. सीताफळ बागेसह ग्रामपंचायतीने अटल आनंद घन वन प्रकल्प अंतर्गत एका गुंठ्यात तीनशे सागवान झाडांची लागवड केली आहे. तसेच तीन महिन्यापूर्वी दहा एकर पडीक गावठाण जमिनीवर एक हजार लिंबु झाडांची सुद्धा लागवड केली आहे. या सर्व झाडांचे योग्य संगोपन सुरु असून सीताफळ व लिंबू लागवडीतून कठोरा ग्रामपंचायतीस वर्षाला येणाऱ्या काळात पाच ते सात लाखाचे उत्पन्न अपेक्षित आहे.

अनेक ग्रामपंचायती हाेणार स्वयंपूर्ण
कठोरा ग्रामपंचायतीने रोजगार हमी योजनेतून एक हजार सीताफळ वृक्षाची लागवड केली. या ग्रामपंचायतीचा आदर्श इतर ग्रामपंचायतीनी घेतल्यास तालुक्यातील ग्रामपंचायती हिरव्या वृक्षसह स्वयंपूर्ण होण्यास वेळ लागणार नाही.
सतीश देशमुख, गटविकास अधिकारी

ग्रामपंचायतीने दुहेरी हित साधले
रोहयो मधून सीताफळ लागवड केली. योग्य संगोपन करून त्या जमिनीचे रूपांतर सुपीक बागेत केले. यातून गावातील मजुरांन रोजगार उपलब्ध झाला. तसेच ग्रामपंचायती उत्पन्नात वाढ झाली. असे दुहेरी हित गावकऱ्यांच्या अनमोल सहकार्याने कठोरा ग्रामपंचायतीने साधले.
पी. आर. खंडारे, ग्रामसेवक

बातम्या आणखी आहेत...