आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामहापालिकेकडून नव्याने नियुक्त केल्या जाणाऱ्या कचरा संकलन व वाहतूक ठेकेदाराला आता तीन वर्षांचाच कालावधी मिळणार आहे. ‘दिव्य मराठी’च्या वृत्तानंतर महापालिका आयुक्तांनी सात वर्षांपर्यंत वाढवलेली ठेक्याची मुदत रद्द करून, ती पुन्हा तीन वर्षांवर आणली आहे. ठेकेदाराचे काम पाहून जास्तीत जास्त आणखी दोन वर्षे मुदतवाढ देता येईल, अशी तरतूद त्यांनी केली आहे.
शहरातील कचरा संकलन व वाहतुकीसाठी महापालिकेकडून खाजगी संस्थेची नियुक्ती केली जाते. सध्याच्या ठेकेदाराची मुदत संपुष्टात येत असल्याने मनपाने नव्याने निविदा प्रसिद्ध केलेली आहे. निविदा प्रसिद्ध झाल्यानंतर त्याची मुदत संपण्याच्या दोन दिवस आधीच महापालिकेत ठेकेदार संस्थांची निविदा पूर्व बैठक पार पडली. यात ठेक्याची मुदत तीन वर्षाऐवजी सात वर्षे करावी, अशी मागणी ठेकेदारांकडून करण्यात आली होती. महापालिका प्रशासनाने ही ठेकेदारांच्या या मागणीला प्रतिसाद देत ठेक्याची मुदत सात वर्षांपर्यंत वाढवली होती.
निविदा प्रक्रियेचा कालावधी संपुष्टात आल्यानंतर त्याला मुदतवाढ देत असताना ठेक्याची मुदत वाढवण्याबाबत निर्णय घेण्यात आला होता. त्यामुळे या कामाची निविदा ३० कोटींवरून ७० कोटींवर पोहोचली. ठेकेदारांच्या मागणीनुसार महापालिका प्रशासनाने महासभा अथवा स्थायी समितीची मान्यता न घेताच परस्पर धोरणात्मक निर्णय घेतल्याने उलट सुलट चर्चांना सुरुवात झाली होती. ‘दिव्य मराठी’ने साेमवारी वृत्त प्रकाशित केल्यानंतर तात्काळ मनपा प्रशासनाने ठेक्याची मुदत सात वर्षांपर्यंत वाढवण्याचा निर्णय मागे घेतला आहे. त्याच्या कालावधी तीन वर्षेच ठेवण्यात आला अाहे. ठेकेदाराचे काम पाहून त्याला पुढील दोन वर्षांसाठी मुदतवाढ देता येईल, अशी तरतूद करण्यात आली आहे.
कामचुकापणा केल्यास प्रतिदिन १५ हजार दंड कचरा संकलन व वाहतूक करणाऱ्या ठेकेदाराकडून कामात कामचुकारपणा झाल्यास प्रतिदिन १५ हजार रुपये दंड आकारण्याची तरतूद करण्यात आली आहे सलग सात दिवस किंवा त्यापेक्षा अधिक कालावधीत कामात हलगर्जीपणा झाल्यास करार रद्द करण्याची अटही महापालिकेने घातली आहे. कचरा संकलन व वाहतूक करताना घंटागाड्यांवर झाकण नसल्यास प्रतिदिन एक हजार रुपये दंडाची तरतूद करण्यात आली आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.