आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

खासगीकरण:वितरण व्यवस्थेसह पाणीपुरवठा योजनेच्या खासगीकरणाचा घाट

नगरएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

शहरातील पाणी पुरवठा व्यवस्थापन, मुळानगर ते वसंतटेकडी दरम्यान पाणीपुरवठा योजनेअंतर्गत मुळानगर, विळद व नागापूर पंपींग स्टेशन, जलशुध्दीकरण केंद्र व मुख्य जलवाहिन्याची देखभाल व दुरूस्ती, तसेच वसंतटेकडी येथून सावेडी, केडगाव, मुकुंदनगर या उपनगरासह शहर हद्दीत पाणी वितरणाच्या संपूर्ण व्यवस्थापनाचे खाजगीकरण करण्याचा घाट घालण्यात आला आहे महापालिका प्रशासनाने याबाबतचा प्रस्ताव निर्णय घेण्यासाठी महासभेकडे सादर केला आहे. गुरुवारी झालेल्या स्थायी समितीच्या सभेत पाणीपुरवठा व्यवस्थापन यंत्रणा रामभरोसे असल्याची जाहीर कबुली प्रशासनाने दिली होती. त्यानंतर आता हा प्रस्ताव समोर आल्याने महापालिका वर्तुळात खळबळ उडाली आहे.

पाणी पुरवठा व्यवस्थापनासाठी ३९ कर्मचारी कार्यरत आहेत. त्यामुळे मशिनरी चालविणे, जलशुध्दीकरण प्रक्रिया, पाईपलाईनवरील देखभाल, दुरूस्ती व पंपिंग स्टेशन मधील दुरूस्तीच्या कामावर नियंत्रण ठेवणे अडचणीचे होत आहे. आवश्यक कर्मचारी उपलब्ध करून देण्याकडे वारंवार दुर्लक्ष झाले. त्यामुळे दिवसेंदिवस परिस्थिती अत्यंत गंभीर होण्याची शक्यता प्रशासनाने व्यक्त केली आहे. या पार्श्वभूमीवर वितरण व्यवस्था व योजनेच्या संपूर्ण व्यवस्थापनाचे खाजगीकरण करणे मनपाच्या दृष्टीने हिताचे आहे, असे नमूद करत प्रशासनाने निर्णयासाठी प्रस्ताव महासभेकडे सादर केला आहे.

सर्वेक्षणाचा प्रस्ताव, अधिकाऱ्यांच्या बैठकाही झाल्या
संपूर्ण पाणी वितरण व्यवस्था व पाणीपुरवठा व्यवस्थापनाचे खाजगीकरण करणे व शहराला २४ तास पाणीपुरवठा सुरळीत व्हावा, या दृष्टीने सर्वेक्षण करून उपाययोजनांचा प्रस्ताव, प्रकल्प अहवाल तयार करण्यासंदर्भात जिओइन्फो सर्विसेसकडून महापालिकेला फेब्रुवारी महिन्यातच प्रस्तावही प्राप्त झाला आहे. यासंदर्भात प्रशासकीय पातळीवर बैठका होऊन आयुक्तांच्या प्रशासकीय मंजुरीनंतर हा प्रस्ताव निर्णयासाठी महासभेकडे सादर करण्यात आला आहे.

देखभाल दुरुस्तीच्या खर्चात मोठी वाढ
शहरासाठी कार्यरत पाणी पुरवठा योजना जुनी असल्याने व योजनेवरील बहुतांशी तांत्रिक कर्मचारी वर्ग सेवानिवृत्त किंवा मयत झाल्याने अत्यंत कमी व अकुशल कामगारांकडून देखभाल व दुरूस्तीची कामे होतात. त्यामुळे देखभाल व दुरूस्तीचा खर्च दिवसेंदिवस वाढत आहे. महानगरपालिकेची स्थापना झाल्यापासून घरगुती वापराच्या पाणीपट्टीत वाढ झालेली नाही. त्यामुळे खर्चाच्या तुलनेत उत्पन्न कमी मिळत असल्याचे मनपा प्रशासनाने म्हटले आहे.

२५० कोटी खर्चूनही यंत्रणा अकार्यक्षम?
शहर पाणीपुरवठा योजनांवर मागील काही वर्षांमध्ये तब्बल अडीचशे कोटींपेक्षाही जास्त रकमेचा खर्च करण्यात आला आहे. पाणीपुरवठा विभागाकडे कर्मचारी अपुरे असल्याने नुकतेच आउटसोर्सिंग द्वारे सुमारे ११९ कर्मचारी या विभागाला उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत. असे असतानाही महापालिकेची सध्याची यंत्रणा व कार्यक्षम ठरत असल्याने या कोट्यावधी रुपयांच्या खर्चावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

तांत्रिक कर्मचाऱ्यांचे प्रमाण कमी
शहर पाणी पुरवठा वितरण व्यवस्थेची तांत्रिक कर्मचा-याअभावी अत्यंत गंभीर परिस्थिती झालेली आहे. वितरण व्यवस्थेच्या कामाचे स्वरूप विचारात घेता उपलब्ध असलेला तांत्रिक कर्मचारी वर्ग अत्यंत कमी प्रमाणात आहे. त्यामुळे नागरीकांच्या दैनंदिन तक्रारींचा वेळेत निपटारा होत नाही. पर्यायाने मुळाधरण येथून उपलब्ध होत असलेले पाणी काही भागास गरजेपेक्षा जास्त व काही भागास अत्यल्प मिळत आहे.

बातम्या आणखी आहेत...