आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आवाहन:ढोरसडेत पिकांवर आढळली घोणस आळी

शेवगाव16 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

शेवगाव तालुक्यातील ढोरसडे येथे शेतकरी रामकिसन तासतोडे यांच्या शेतातील जनावरांचा चारा गिन्नी गवतावर घोणस आळी आढळून आली आहे. या किडीच्या नियंत्रणासाठी शेतकऱ्यांनी फवारणी करावी, असे आवाहन कृषी विभागाने केले.याबाबत शेवगाव कृषी विभागाने यासंदर्भात माहिती दिली. या आळीला इंग्रजीमध्ये स्लज कॅटरपिलर असे संबोधतात. ही एक बहुभक्षी कीड आहे. बांधावरील गवतावर, एरंडी, आंब्याच्या झाडावर, चहा, कॉफी यासारखे पिके व इतर फळ पिकावर एखादी आळी दिसून येते. असे असले तरी एखाद्या परिसरामध्ये ही कीड जास्त प्रमाणात आल्यास अधाशाप्रमाणे पानावरील हिरवा भाग खाऊन फक्त शिरा शिल्लक ठेवल्याचे देखील उदाहरणे आहेत.

स्लज कॅटरपिलर या आळीच्या संपर्कात आपली त्वचा आल्यास दाह होतो. तो शक्यतो सौम्य असतो. या किडीचे नैसर्गिक नियंत्रण निसर्गातील विविध मित्र किडी करत असतात. किडीचा संपर्क आल्यास आपण घरी वापरतो तो चिकट टेप हा दंश झाल्याच्या ठिकाणी हलक्या हाताने लावून काढून घ्यावा. यामुळे या अळीचे केस सहजपणे निघून जाऊन दाह कमी होण्यास मदत होते. त्याचप्रमाणे ज्या ठिकाणी दंश झाला आहे त्या ठिकाणी बर्फ लावणे व काही प्रमाणात बेकिंग सोडा व पेस्ट लावणे हे फायदेशीर आहे. लक्षणे तीव्र असल्यास वैद्यकीय अधिकाऱ्यांचा सल्ला घ्या. किडीच्या नियंत्रणासाठी क्लोरोपायरीफॉस (२५ मिली प्रती १० लि. पाणी), प्रोफेनोफोस (२० मिली प्रती १० लि. पाणी), क्वीनॉलफॉस (२५ मिली प्रती १० लि. पाणी), इमामेक्टिन बेंजोएट (४ ग्रॅम प्रती १० लि. पाणी), ५ टक्के निमार्क हे उपयुक्त ठरू शकतात, असे शेवगाव कृषी अधिकारी अंकुश टकले व शेवगाव विभागाचे कृषी मंडल अधिकारी कानिफनाथ मरकड यांनी सांगितले.

बातम्या आणखी आहेत...