आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ढोरसडे येथील शेतात आढळली घोणस अळी:शेवगाव कृषी विभागाने दिली माहिती, सोशल मीडियात वेगवेगळे तर्क वितर्क

अहमदनगर21 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

शेवगाव तालुक्यातील ढोरसडे येथे शेतकरी रामकिसन तासतोडे यांच्या शेतातील जनावरांचा चारा गिन्नीगवतावर घोणस अळी आढळून आली. शेवगाव तालुक्यातील सोशल मीडियामध्ये या अळीविषयीवेगवेगळे तर्क वितर्क लावून अनेक जण याविषयी वेगवेगळी माहिती पसरवत आहेत. यामुळे अनेक शेतकरी संभ्रमात पडले आहेत. शेवगाव कृषी विभागाने यासंदर्भात माहिती दिली.

या अळीला इंग्रजीमध्ये स्लज कॅटरपिलर असे संबोधतात. ही एक बहुभक्षी कीड आहे. बांधावरील गवतावर, एरंडी, आंब्याच्या झाडावर, चहा, कॉफी यासारखे पिके व इतर फळ पिकावर तुरळ ठिकाणी एखादी अळी दिसून येत असते. असे असले तरी एखाद्या परिसरामध्ये ही कीड जास्त प्रमाणात आल्यास अधाशाप्रमाणे पानावरील हिरवा भाग खाऊन फक्त शिरा शिल्लक ठेवल्याचे देखील उदाहरणे आहेत.

केसातून बाहेर टाकतात रसायन

पावसाळ्यात, पावसाळ्याच्या सरतिला, उष्ण व आद्र हवामानात ही अळी दिसून येते. या अळीच्या अंगावर बारीक बारीक केस असतात. त्याखाली काही विष ग्रंथी असतात व या केसातून ते विशिष्ट रसायन किंवा विष त्यांच्या स्वसंरक्षणासाठी बाहेर टाकतात. हे रसायन त्वचेच्या संपर्कात आल्यास त्वचेवर चट्टे पडून अग्नी दाह होतो.

तीव्र स्वरूपाची लक्षणे

ही अळी माणसाच्या अंगावर किंवा माणसाच्या दिशेने येत नाही. ज्याप्रमाणे गांधींमाशीचा डंक लागल्यावर दाह होतो, केसाळ अळी किंवा घुले यांच्या संपर्कातून अ‍ॅलर्जी होते त्याचप्रमाणे स्लज कॅटरपिलर या अळीच्या संपर्कात आपली त्वचा आल्यास अग्नीदाह होत असतो. तो शक्यतो सौम्य असतो पण ज्या व्यक्तींना अ‍ॅलर्जी आहे किंवा दम्याचा त्रास आहे त्या व्यक्तीमध्ये मात्र तीव्र स्वरूपाची लक्षणे आपणास पाहावयास मिळू शकतात.

या उपाययोजना करा

या किडीच्या नियंत्रणासाठी विशिष्ट अशा रसायनाची किंवा कीटकनाशकाची शिफारस नसली तरी नेहमीच्या वापरातील कीटकनाशक जसे की क्लोरोपायरीफॉस (25 मिली प्रती 10 लि. पाणी), प्रोफेनोफोस (20 मिली प्रती 10 लि. पाणी), क्वीनॉलफॉस (25 मिली प्रती 10 लि. पाणी), इमामेक्टिन बेंजोएट (4 ग्रॅम प्रती १० लि. पाणी ), 5 टक्के निमार्क हे उपयुक्त ठरू शकतात, असे शेवगाव कृषी अधिकारी अंकुश टकले व शेवगाव विभागाचे कृषी मंडल अधिकारी कानिफनाथ मरकड यांनी सांगितले.

बातम्या आणखी आहेत...