आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मनपा विरोधी पक्ष:तुला ना याला, द्या तिसऱ्याला

नगर8 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

महापालिकेतील विरोधी पक्ष नियुक्तीचा वाद शनिवारी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासमोर रंगला. माजी महापौर बाबासाहेब वाकळे व विद्यमान शहर जिल्हाध्यक्ष भय्या गंधे या दोघांनीही आपल्यालाच हे पद मिळावे, अशी मागणी बावनकुळे यांच्याकडे केली. त्यावर ’एक व्यक्ती-एक पद’ या नात्याने तुम्ही दोघेही थांबा, तुमच्याऐवजी एखाद्या सर्वसामान्य नगरसेवकाला हे पद द्या, अशी सूचना वजा तोडगा काढला. त्यामुळे तुला ना याला, द्या तिसऱ्याला या अनोख्या तोडग्याने पक्षात विरोधी पक्षनेते पदाचा वाद पुन्हा चर्चेत आला आहे. तुम्ही सर्व नगरसेवक एकत्र बसून नाव सुचवा, नाहीतर मी प्रदेश पातळीवरून नाव देतो, असा अंतिम पर्यायही त्यांनी दिला आहे.

माजी महापौर बाबासाहेब वाकळे यांना विरोधी पक्ष नेता पदावर नियुक्तीचे पत्र यापूर्वीच महापौर रोहिणी शेंडगे यांनी दिलेले आहे. मात्र, पक्ष पातळीवरून झालेल्या हालचालीनंतर त्यांनी पदाचा कार्यभार स्वीकारला नाही. भाजपमधून वाकळेंसह शहर जिल्हाध्यक्ष गंधे तसेच माजी उपमहापौर मालनताई ढोणे, स्थायी समितीचे माजी सभापती मनोज कोतकर असे चारजण इच्छुक आहेत. एक व्यक्ती-एक पद धोरणानुसार या सर्वांपैकी तिघांनी पदे भूषवली व एकजण सध्या पदावर आहे. पण त्यांच्यातच रस्सीखेच सुरू असल्याने मनपाची आगमी निवडणूक सव्वा वर्षावर आली असतानाही भाजपला विरोधीपक्ष नेतेपद मिळालेले नाही. शनिवारी प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांच्या दौऱ्यात हा विषय पुन्हा चर्चेत आला.

शासकीय विश्रामगृहावर माजी आमदार शिवाजी कर्डिले, वाकळे यांनी नगरसेवकांसह त्यांची भेट घेतली. त्यावेळी कर्डिले यांनी विरोधी पक्षनेते पदावरील नियुक्तीचा प्रश्न उपस्थित केला. महापौर शिवसेनेतील ठाकरे गटाच्या असल्या तरी आपल्यातील वादामुळेच निवड प्रलंबित असल्याचे त्यांनी बावनकुळे यांना सांगितले. त्यानंतर बावनकुळे यांनी गंधे यांच्या निवासस्थानीही कार्यकर्त्यांच्या भेटी घेतल्या. तेथे गंधे व वाकळे या दोघांनीही आपापली बाजू मांडली. त्यावर बावनकुळे यांनी ईश्वरचिट्ठी काढून प्रश्न निकाली काढा, असे स्पष्ट केले. मात्र, तेथून गंधे यांच्या निवासस्थानी गेल्यावर मात्र बावनकुळे यांनी पक्षाची शहरातील परिस्थिती लक्षात घेऊन वेगळाच तोडगा सांगितला. वाकळे व गंधे या दोघांनीही थांबावे व तिसऱ्या नगरसेवकाचे नाव सुचवावे. सर्वांनी एकत्रित बसून नाव मला कळवा. नाही कळवले तर मी वरून नाव जाहीर करून टाकेन, असे त्यांनी स्पष्ट केले.