आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराजूनी पेन्शन योजना लागू करण्याच्या मागणीसाठी राज्यभरातील सुमारे १८ लाख शासकीय कर्मचारी मंगळवारपासून (ता. १४) बेमुदत संपावर जात आहेत. नगर जिल्ह्यातील प्राथमिक शाळेतील २१ हजार, तर माध्यमिक व उच्च माध्यमिकचे सुमारे ८ हजार ९२८ शिक्षक या संपात सहभागी होणार आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील शाळांचे कामकाज मंगळवारपासून (१४ मार्च) बेमुदत ठप्प होण्याची शक्यता आहे. तथापि, जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने अंगणवाडी सेविकांना या शाळांवर पाठवण्याची तयारी केली आहे. त्यामुळे शाळा सुरूच राहणार असल्याचा दावा प्रशासनाने केला आहे. मंगळवारी शिक्षकांचा आनंद विद्यालय ते जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा निघणार आहे.
अंगणवाडी सेविकांना आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन
शिक्षक समन्वय समितीच्या वतीने सर्व शिक्षकांना आम्ही आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन केले आहे. जुन्या पेन्शनची मागणी मान्य होईपर्यंत आम्ही बेमुदत संपावर जात आहोत. विद्यार्थ्यांचे नुकसान भरून काढू, तसेच अंगणवाडी सेविकांनाही शाळेवर जाऊ नये, असे आवाहन केले आहे. सुनील पंडित, मुख्याध्यापक संघ.
अशी आहे जिल्ह्यातील शिक्षकांची संख्या
जिल्हा परिषद शाळा, तसेच खासगी अनुदानित शाळेतील १४ हजार ५१५, उच्च प्राथमिकचे ४ हजार ५५१, प्राथमिक अधिक उच्च प्राथमिकच्या शाळेवरील २ हजार ६८ शिक्षक. माध्यमिक शाळेतील ५ हजार ४०४, उच्च माध्यमिकचे ३ हजार ५२४, माध्यमिक अधिक उच्च विद्यालयातील २९० शिक्षक बेमुदत संपात सहभागी होणार आहेत.
उद्याचा संप मोडून काढण्याचा राज्य सरकारचा प्रयत्न
आंदोलनात शिक्षक समितीसह सर्व शिक्षक सहभागी आहेत. शासनाच्या बैठकीत तोडगा न निघाल्याने, आता आमचा संप मोडून काढण्यासाठी शासन पर्यायी व्यवस्था करीत आहे. परंतु, आम्ही आमच्या मागण्यांसाठी संपावर ठाम आहोत.- रा. या. औटी, शिक्षक समिती.
विद्यार्थ्यांच्या नुकसानीस शासन जबाबदार राहील
जिल्हाभरातील शिक्षक संपात सहभागी झालेले असून, नगर शहरातील आनंद विद्यालयापासून सर्व शिक्षक मोर्चा काढून जिल्हाधिकारी कार्यालयाकडे जाणार आहेत. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक नुकसानीस शासनच जबाबदार असेल.- बापूसाहेब तांबे, शिक्षक नेते, प्राथमिक.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.