आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराराज्य सरकारी व निमसरकारी कर्मचाऱ्यांनी जुन्या पेन्शन योजनेसाठी मंगळवार १४ मार्च पासून बेमुदत संप सुरू केला आहे. विविध सरकारी कर्मचारी संघटनांच्या वतीने मंगळवारी नगरच्या जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात विविध सरकारी विभागातील कर्मचाऱ्यांसह शिक्षक, परिचारिका व विविध संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते. या संपात ३० हजार कर्मचारी सहभागी झाल्याचा दावा राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेने केला आहे. दरम्यान, या संपामुळे मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयातील कामकाज ठप्प झाले होते. विविध विभागात सकाळपासूनच शुकशुकाट होता. या संपाचा शाळा, महाविद्यालयांच्या कामावरही परिणाम झाला.
राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेचे अध्यक्ष सुभाष तळेकर, सरचिटणीस रावसाहेब निमसे, उपाध्यक्ष भाऊसाहेब ढमाळे यांच्या नेतृत्वाखाली हा संप करण्यात आला. सरकारी -निमसरकारी सरकारी शिक्षक, शिक्षकेतर ,महापालिका,नगरपालिका नगरपरिषदा, नगरपंचायती कर्मचारी संघटनेच्या मागण्या अनेक वर्षापासून प्रलंबित आहेत. जुनी पेन्शन योजना लागू करा, कंत्राटी कर्मचाऱ्यांना सेवेत नियमित करा, सर्व रिक्त पदे भरा, निवृत्तीचे वय ६० वर्षे करा, नवीन शिक्षण धोरण रद्द करा, केंद्र प्रमाणे वाहतूक शैक्षणिक व इतर भत्ते द्यावेत, शिक्षणसेवक, ग्रामसेवकांना देण्यात येणाऱ्या मानधनात महागाईचा विचार करून वाढ द्यावी, शासकीय विभागात खाजगीकरण कंत्राटीकरण करू नये,या मागण्यांसाठी संघटनेच्या वतीने हा संप सुरू करण्यात आला आहे. राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेचे उपाध्यक्ष पी. डी. कोळपकर, विलास पेदराम, बाळासाहेब वैद्य,विजय काकडे, के.के आव्हाड, ज्ञानेश्वर कांबळे, सहचिटणीस कैलास साळुंखे, रवी डिग्रस, संदीपान कासार, सुभाष बांगर, सुधाकर पाखरे, संघटक देविदास पारधे, बी .एस थोरात बी.एम नवघन, संजय येरगुंटला, सयाजी वाव्हळ,सुरेश जेठे देविदास पारेकर, एस. एन. वाबळे, ए.व्ही.बडदे, नलिनी पाटील,परिचारिका संघटनेच्या अध्यक्षा सुरेखा आंधळे संपात सहभागी झाले होते.
संपाच्या पार्श्वभूमीवर विविध शाळा, महाविद्यालये, जिल्हा परिषद कर्मचारी व अन्य सरकारी कर्मचारी संघटनांनी नगरच्या जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून जुन्या पेन्शन योजना लागू करण्याची मागणी केली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संपाच्या पार्श्वभूमीवर बोलवलेल्या बैठकीत तोडगा न निघाल्याने आम्ही हा संप सुरू केला आहे. असे संघटनेचे अध्यक्ष सुभाष तळेकर यांनी सांगितले.जोपर्यंत जुनी पेन्शन योजना लागू होत नाही तोपर्यंत संप सुरूच राहील. आपत्कालीन स्थितीत अडचण आल्यास काही कर्मचाऱ्यांच्या नेमणुका आम्ही केलेल्या आहेत, जेणेकरून रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांचे हाल होणार नाहीत, असेही तळेकर यांनी सांगितले.
दहावी व बारावी बोर्डाची परीक्षेला सहकार्य
दहावी व बारावी परीक्षेला पर्यवेक्षक, केंद्रसंचालकांनी उपस्थित राहून काळ्याफिती लावून परीक्षेचे कामकाज करावे, मस्टरवर स्वाक्षरी करू नये, इतर वर्गांना सुट्टी द्यावी रहावे, असा निर्णय जिल्हा प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय शाळा मुख्याध्यापक शिक्षकेतर जिल्हा समन्वय समितीच्या बैठकीत घेण्यात आला.
संपाचा असाही घेतला उपयोग करून
राज्य सरकारी व निमसरकारी कर्मचाऱ्यांचा मंगळवारी संप होता. या संपात शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी देखील सहभागी झाले होते. मंगळवारी अनेक शिक्षकांनी संपावर असतानाच जिल्हा शासकीय रुग्णालयात प्रमाणपत्र घेण्यासाठी गर्दी केल्याचे दिसून आले. तर काही शिक्षक मोर्चासोडून खानावळी व अन्य ठिकाणी गेल्याचे दिसून आले.
पेन्शनचा निर्णय होईपर्यंत माघार नाही
या संपाला जिल्ह्यात मोठा पाठिंबा मिळाला आहे. संपात ३० हजार कर्मचारी सहभागी झाले होते, असा दावा राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेचे अध्यक्ष सुभाष तळेकर यांनी केला आहे. आम्ही संपावर ठामच आहोत, पेन्शनचा निर्णय जोपर्यंत होत नाही तोपर्यंत माघार घेणार नाही, असे तळेकर यांनी यावेळी सांगितले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.