आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नुकसानग्रस्त शेतीचे पंचनामे करा:शासनाने नुकसान भरपाई द्यावी; दूध संघाचे अध्यक्ष राजेश परजणे पाटील यांची मागणी

अहमदनगर14 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

कोपरगाव तालुक्यात गेल्या पाच दिवसांपासून पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे लाखो हेक्टरवरील खरीप पिकांचे व फळबागांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. अनेक गांवामध्ये प्रचंड प्रमाणात पाणी शिरून घरांचे देखील नुकसान झाले आहे. या नुकसानीचे शासनाने तातडीने पंचनामे करून नुकसानग्रस्तांना आर्थिक मदत मिळवून द्यावी, अशी मागणी जिल्हा परिषदेचे माजी सदस्य व गोदावरी खोरे दूध संघाचे अध्यक्ष राजेश परजणे पाटील यांनी रविवारी (11 सप्टेंबर) केली.

शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेला

परजणे यांनी यासंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महसूल, पशुसंवर्धन व दुग्धविकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांना निवेदन पाठवले. कोपरगाव तालुक्यात ८ सप्टेंबरपासून वादळी वाऱ्यासह आणि विजेच्या कडकडाटासह दररोज पडत असलेल्या पावसामुळे तालुक्याच्या बहुतांशी भागातील पिके भूईसपाट झाली. शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावून गेला. या नैसर्गिक हानीमुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाल्याने शासनाने तातडीने या नुकसानीचे पंचनामे करुन नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळवून देणे गरजेचे आहे.

मुसळधार पावसाने कोपरगाव तालुक्याच्या पश्चिम भागातील सोनेवाडी, पोहेगाव, चांदेकसारे, डाऊच बुद्रूक, घारी, जेऊर कुंभारी या गावांना प्रामुख्याने वादळी पावसाचा मोठा तडाखा बसला. डाऊच येथे वीज पडून जनावरे दगावल्याची घटना घडली आहे. तालुक्यात पूर्व भागातही पावसामुळे शेतातील सोयाबीन, मका, कपाशी, भईमूग, बाजरी, तूर, उडीद, मूग, कांदा रोपे तसेच भाजीपाला पिकांसह ऊसाचे देखील नुकसान झाले. अनेक ठिकाणची शेती पाण्यामुळे वाहून गेली. अनेक ठिकाणी मोठी झाडी, पत्र्याची व मातीची घरे, झोपड्या जमीनदोस्त झाल्या आहेत. काही ठिकाणचे शेतबंधारे फुटल्याने पिकांत पाणी शिरून पिकांचे अतोनात नुकसान झाले.

शेतकऱ्यांना मिळाले नाही विम्याचे पैसे

ग्रामीण भागातील रस्ते जलमय झाल्याने दैनंदिन दळणवळणावर विपरित परिणाम झाला. अनेक शेतातल्या केळी, डाळींब, पपई, चिक्कू, पेरुच्या बागा कोलमडून पडल्या. शेतकऱ्यांचे कोट्यवधींचे नुकसान झाले. फळबागांसाठी लाखो रुपये खर्च करूनही नैसर्गिक आपत्ती ओढावल्याने शेतकरी हवालदिल झाले. मागील वर्षी अनेक शेतकऱ्यांनी पीक विमा उतरवलेला असताना बऱ्याच शेतकऱ्यांना अद्याप विम्याचे पैसे मिळाले नाहीत.

शेतकरी आर्थिक संकटात

मागील वर्षीच्या नुकसान झालेल्या पिकांचीही भरपाई अद्याप मिळाली नाही. तरीही कर्जे काढून यंदा शेतीचे नियोजन केलेले असताना अतिवृष्टी आणि वादळामुळे पुन्हा शेतकऱ्यांना संकटाला तोंड देण्याची वेळ आली. या आपत्तीमुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडले. त्यांना आर्थिक मदतीशिवाय पर्याय राहिलेला नाही. शासनाने नुकसान झालेल्या शेती पिकांचे, फळबागांचे तसेच उद्ध्वस्त झालेल्या घरांचे तालुका कृषी विभाग, महसूल विभाग, गटविकास अधिकारी यांना पंचनामे करण्याबाबतच्या सूचना देऊन शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देऊन आधार द्यावा, अशीही मागणी परजणे पाटील यांनी केली.

बातम्या आणखी आहेत...