आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चेन हिसकावली:मंगळसूत्र हिसकावत चोरटा उड्डाणपूलमार्गे पसार

नगर9 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर - औरंगाबाद महामार्गावर गुरुद्वाराजवळ दुचाकीवरून आलेल्या चोरट्याने महिलेच्या गळ्यातील चेन हिसकावली. उड्डाणपुलावरून तो पसार झाल्याचे सांगण्यात आले. तर दुसऱ्या घटनेत भिंगार शहरातील सरपण गल्ली येथे पायी जात असलेल्या महिलेच्या गळ्यातील गंठण हिसकावत चोरट्याने धूम ठोकली. बुधवारी दुपारी दोन ते तीन वाजण्याच्या सुमारास या दोन्ही घटना घडल्या.

पलक विक्रम चुग (रा. तारकपूर) या दुपारी २ वाजण्याच्या सुमारास दुचाकीवरून (एमएच ०५ बीटी १७४३) मुलाला कॉन्व्हेंट हायस्कूल मधून आणण्यासाठी जात असताना डीएसपी चौकाच्या पुढे गुरूदवाराजवळ पाठीमागून दुचाकीवर आलेल्या चोरट्याने त्यांच्या गळ्यातील एक तोळ्याची चेन हिसकावून पोबारा केला. महिलेने त्याचा पाठलाग केला. मात्र, तो उड्डाणपुलावरून वेगात पसार झाला. त्यानंतर काही वेळातच संगीता गणेश बारटक्के या पायी जात असताना सरपण गल्ली (भिंगार) येथून अनोळखी चोरट्याने त्यांच्या गळ्यातील पावणे दोन तोळे वजनाचे मंगळसूत्र ओढून धूम ठोकली.

घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. कोतवाली व तोफखाना पोलिसांनी औरंगाबाद रस्त्यावर पाहणी करत परिसरातील दुकानांमध्ये असलेले सीसीटीव्ही फुटेज तपासले. तर भिंगार कॅम्प पोलिसांनी घटनास्थळी जाऊन माहिती घेतली. शहर विभागाचे पोलिस उपअधीक्षक अनिल कातकाडे यांनीही घटनास्थळी जाऊन पाहणी केली व तपासाबाबत सूचना दिल्या.याप्रकरणी भिंगार कॅम्प पोलिस ठाण्यात दोन फिर्यादी दाखल करण्यात आल्या आहेत. दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून चर्चेत असलेला उड्डाणपूल धूमस्टाईल मंगळसूत्र चोरीमुळे पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.

पोलिसांसमोर तपासाचे आव्हान
गेल्या महिनाभरापासून नगर शहर व उपनगर परिसरात सातत्याने चोरीच्या घटना होत आहेत. मंगळसूत्र चोरांनी अक्षरशः उच्छाद मांडला आहे. आठवड्यातून किमान चार ते पाच घटना घडत असून या चोरट्यांचा बंदोबस्त करण्यात पोलिसांना अपयश आले आहे. त्यांचा शोध लावण्याचे आव्हान पोलिसांसमोर उभे आहे.

बातम्या आणखी आहेत...