आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अडचण:जुन्या जिल्हाधिकारी दालनात पालकमंत्री कार्यालय ; उपविभागीय कार्यालयावर नव्याने जागा शोधण्याची वेळ

नगरएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

सध्या नगर उपविभागीय कार्यालय असलेल्या जुन्या जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हाधिकाऱ्यांच्या तत्कालीन दालनात आता पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांचे कार्यालय सुरू होणार आहे. याच आठवड्यात या कार्यालयाचे उद्घाटन होण्याची शक्यता असून त्या दृष्टीने प्रशासनाकडून तयारी सुरू झाली आहे. प्रथमच पालकमंत्र्यांसाठी कार्यालय होत असले, तरी यासाठी नगर उपविभागीय कार्यालयावर 'बेघर' होण्याची वेळ आली आहे. या प्रांताधिकारी कार्यालयासाठी आता नवीन जागेचा शोध सुरू करण्यात आला आहे. औरंगाबाद रस्त्यावर नवीन जिल्हाधिकारी कार्यालय सुरू झाल्यानंतर, जुन्या इमारतीमधील नियोजन विभागाच्या कार्यालयात नगर-नेवासा उपविभागीय कार्यालय स्थलांतरित करण्यात आले. मात्र, काही महिन्यातच आता जिल्हाधिकाऱ्यांचे दालन पालकमंत्री विखे यांच्यासाठी देण्यात आले आहे. त्याची रंगरंगोटी, फर्निचर बदलण्याचे काम सध्या सुरू आहे. दोन वर्षांपूर्वी डॉ. राजेंद्र भोसले नियुक्त झाल्यानंतर त्यांनी दालनाचे नूतनीकरण करून घेतले होते. परंतु आता पालकमंत्र्यांच्या कार्यालयासाठी पुन्हा नूतनीकरण सुरू करण्यात आले आहे. शुक्रवारी (२४ डिसेंबर) जिल्हा नियोजन समितीची सभा पालकमंत्री विखे यांच्या अध्यक्षतेखाली होत आहे.

त्यावेळी या नूतन कार्यालयाचे उद्घाटनाचा होण्याची शक्यता आहे.नगर जिल्ह्यात यापूर्वी कोणत्याही पालकमंत्र्यांना प्रशासकीय आवारात स्वतंत्र कार्यालयाची आवश्यकता भासली नाही. पालकमंत्री राम शिंदे यांनी स्वतःचे खाजगी कार्यालय सावेडी उपनगरात सुरू केले होते. जयंत पाटील, दिलीप वळसे, हसन मुश्रीफ अशा जिल्ह्याबाहेरील पालकमंत्र्यांनाही नगरमध्ये स्वतंत्र कार्यालयाची आवश्यकता भासली नाही. पालकमंत्री विखे यांचे नगर शहरात स्टेशन रस्त्यावरील दूधसागर इमारतीत व विळद घाटात हक्काचे कार्यालय आहे. मात्र त्यांना सरकारी जागेत कार्यालय हवे असल्याचे समजले. त्यामुळे नगरच्या प्रांताधिकाऱ्यांना नवीन कार्यालय शोधण्यास सांगण्यात आले आहे.

मुद्रांक शुल्क विभागाला शिफारस पत्र आणावे लागले? जुन्या जिल्हाधिकारी कार्यालयाच्या एका बाजूला विविध बैठ्या इमारती आहेत. जिल्हाधिकारी कार्यालय नवीन इमारतीत स्थलांतरित झाल्यानंतर या सर्व बैठ्या इमारती ओस पडल्या होत्या. पाठीमागील बाजूस असलेला मुद्रांक शुल्क विभाग अतिरिक्त जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनात व त्या लगतच्या रोहयो विभागात स्थलांतरित करण्यात आला आहे. याशिवाय राज्य उत्पादन शुल्क विभाग जुन्या नगर-नेवासा उपविभागीय कार्यालयात स्थलांतरित करण्यात आला आहे. मुद्रांक शुल्क विभागाला जागा मिळवण्यासाठी महसूलमंत्र्यांचे शिफारसपत्र आणावे लागल्याची चर्चा आहे.

बातम्या आणखी आहेत...