आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करागेल्या अनेक वर्षांपासून गुलमोहर रस्त्याची दुरावस्था झाली आहे. महापालिकेने सुमारे साडेचार कोटी रुपये खर्चाचे नवीन रस्त्याचे काम मंजूर केले आहे. मात्र, रुंदीकरण व डांबरीकरणाचे काम ठप्पच आहे. त्यात ड्रेनेजलाईनचे सुरू केलेले कामही अर्धवट अवस्थेत सोडल्यामुळे येथील नागरिक आगीतून फुफाट्यात सापडले आहेत. रस्त्यावर मातीचे ढिगारे साचल्यामुळे हा रस्ता आहे की, अॅडव्हेंचर लँड असा खोचक सवाल नागरिक उपस्थित करत आहेत.
सावेडी उपनगर परिसरातील उच्चभ्रू वस्ती असलेला, तसेच सर्वाधिक रहदारीचा प्रमुख रस्ता असलेल्या गुलमोहर रस्त्यावर सर्वत्र खड्ड्यांचे साम्राज्य आहे. महापालिकेने या रस्त्याच्या डांबरीकरणासाठी साडेचार कोटी रुपये मंजूर केले आहेत. या रस्त्याच्या रुंदीकरणासाठी काही ठिकाणी काम चालू करण्यात आले होते. तसेच या रस्त्यावर ड्रेनेज लाईनचे काम सुरू करण्यात आले आहे. मात्र, मागील तीन-चार दिवसांपासून ही सर्व कामे ठप्प आहेत.
रस्ता रुंदीकरणासाठी अनेक ठिकाणी रस्त्यांची खोदाई करण्यात आली आहे. ड्रेनेज लाईनसाठी नागरिकांच्या घरांसमोर मोठे खड्डे घेण्यात आले आहेत. मात्र, अर्धवट अवस्थेत काम सोडल्यामुळे तेथील रहिवासी नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. आधीच रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे त्रस्त असलेल्या नागरिकांची अवस्था आगीतून फुफाट्यात अशी झाली आहे. रस्त्यावर ठिकठिकाणी मातीचे ढिगारे साचले आहेत. त्यामुळे वाहतुकीचा बोजवारा उडाला असून, महापालिकेच्या या भोंगळ कारभाराविरोधात नगरकरांमधून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत.
पायी चालणेही अवघड
गुलमोहोर रस्त्याची अनेक दिवसांपासून दुरावस्था झाली आहे. त्यामुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. रस्त्याचे काम व ड्रेनेजचे काम अर्धवट अवस्थेत सोडल्यामुळे रस्त्याने पायी चालणेही मुश्कील झाले आहे. वाहन चालवतानाही कसरत करावी लागत असल्याने अपघातही होत आहेत. महापालिकेने लवकरात लवकर हे काम मार्गी लावावे.''
ऋषिकेश देशमुख, नागरिक.
काम सुरू करण्याचे आदेश
रस्त्याचे व ड्रेनेज लाईनचे काम करताना तेथील पाण्याच्या लाइन तुटल्या होत्या. त्याची दुरुस्ती करण्यात आली आहे. त्यानंतर ड्रेनेज लाईनचे काम सुरू करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. रस्ता रुंदीकरण व डांबरीकरणाचे कामही लवकरात लवकर मार्गी लावले जाईल. तशा सूचना ठेकेदाराला देण्यात आल्या आहेत.''
सुरेश इथापे, शहर अभियंता.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.