आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिक्षक बँक निवडणूक:गुरूजींचा स्वबळाचा नारा! अन् आतून आघाड्यांची गोळा बेरीज ; इब्टाची स्वबळाची घोषणा

नगर23 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

जिल्हा प्राथमिक शिक्षक बँकेच्या निवडणूक रणधुमाळीत गुरूजींचे राजकारण एका वेगळ्याच वळणावर जाताना दिसून येत आहे. सत्ताधारी गुरूमाऊली मंडळात फूट पडल्यानंतर विरोधी मंडळांनीही स्वबळाचा नारा दिला आहे. परंतु, हा नारा केवळ सभासद कार्यकर्त्यांमध्ये चैतन्य निर्माण करण्यापुरताच ठरणार आहे. विरोधी मंडळांनी सत्ताधाऱ्यांना रोखण्यासाठी समविचारींसोबत आघाडी करण्यासाठी चाचपणी सुरू केली आहे. जिल्हा प्राथमिक शिक्षक बँकेचा कार्यकाळ फेब्रुवारी २०२१ मध्ये संपुष्टात आला. मतदार याद्यांचा कार्यक्रम आटोपल्यानंतर कोणत्याही क्षण निवडणुकीचा बिगूल वाजणार आहे. मागील निवडणुकीत रावसाहेब रोहोकलेंंच्या नेतृत्वाखालील गुरुमाऊली मंडळाने सदिच्छा महाआघाडी, तसेच गुरुकुल-बहुजन मंडळाचा पराभव करून परिवर्तन घडवले होते. त्यावेळी गुरुकुल-बहुजन मंडळ यती तसेच ऐक्य, ऐक्य सुपा, गुरुसेवा, समांतर गुरुकुल या मंडळांसह सदिच्छा महाआघाडी केल्याने त्यावेळची निवडणूकही गाजली होती. सत्तेत आल्यानंतर गुरूमाऊली मंडळात फूट पडून बापू तांबे व आबा जगताप हे दोन धुरंधर बाहेर पडले. गुरूमाऊलीत पडलेली फूट विरोधी मंडळांना ताकद देणारी ठरली असून त्याच धरतीवर रणनिती आखली जात आहे. रोहोकले गटाचे गुरूमाऊली, ऐक्य, सदिच्छा, इब्टा प्रणित बहुजन मंडळाने स्वबळाचा नारा दिला. परंतु, विरोधी मंडळांनी पडद्यामागे आघाडीसाठी जुळवाजुळव सुरू केल्याची माहिती आहे. त्यामुळे निवडणुकीत रंगत वाढणार आहे.

आम्हाला कोणतेच मंडळ वर्ज्य नाही ^ संगमनेरच्या सहविचार सभेत आम्ही स्वबळाचा नारा दिला. परंतु, आम्हाला कोणतेच मंडळ वर्ज्य नाही. इतरांकडून चर्चेसाठी फोन येतात, पण सध्यातरी कोणाच्याही संपर्कात नाही. कोअर कमिटी लवकरच निर्णय घेईल. गुरूमाऊलीत पडलेल्या शकलांचा फायदा होईल.'' एकनाथ व्यवहारे, जिल्हाध्यक्ष, बहुजन मंडळ (इब्टा).

समविचारींना बरोबर घेऊ ^ आघाडीसाठी सर्व समविचारी मंडळांना बरोबर घेऊन सभासद हिताचा कारभार करण्याची आमचीही मानसिकता आहे. परंतु, ही आघाडी करताना रोहोकले व तांबे गटाबरोर आम्ही जाणार नाही. सदिच्छा, गुरूकुल व समविचारी एकत्र येण्याची शक्यता नाकारता येणार नाही.'' राजेंद्र शिंदे, सदिच्छा मंडळ.

रावसाहेबांचा एककल्लीपणाचा कंटाळा ^ आगामी निवडणूक आम्ही महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ नावावर लढणार आहोत. रावसाहेबांच्या एककल्लीपणाला कंटाळून बाजूला व्हावे लागले. नंतर तांबेनेही चुकीची घड्याळ खरेदी केली. आम्ही भा.दा. पाटलांच्या विचारांना मानणारे आहोत. समविचारींबरोबर जाऊ.'' आबा जगताप, म. रा. प्रा. शि. संघ.

बातम्या आणखी आहेत...