आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराअहमदनगर जिल्ह्यातल्या कर्जतमध्ये एका तरुणावर 10 ते 15 जणांनी हल्ला केल्याचे समोर आले आहे. प्रतीक उर्फ सनी राजेंद्र पवार असे या तरुणाचे नाव आहे.
दरम्यान, नुपूर शर्मांचा डीपी व्हॉट्सअॅपवर ठेवतो म्हणून ही मारहाण झाली. हे अमरावती येथील उमेश कोल्हे हत्याकांडासारखे प्रकरण आहे, असा आरोप भाजप नेते नितेश राणे यांनी केलाय. यामुळे एकच खळबळ उडालीय. दरम्यान, हे प्रकरण पूर्ववैमनस्यातून घडल्याचे समोर आले आहे.
नेमके प्रकरण काय?
प्रतीक उर्फ सनी राजेंद्र पवार हा गुरुवारी रात्री 8 च्या सुमारास कर्जतमधील भांडेवाडी रोडवरून जात होता. यावेळी हैदरवाडा भागात राहणाऱ्या तरुणांनी लाकडी दांडग्याने सनीला मारहाण केली. नूपर शर्मा यांचे समर्थन करण्याच्या प्रकरणाशी याचा काही संबंध असल्याचे अद्याप तरी नेमकेपणाने स्पष्ट झालेले नाही. मात्र, पोलिस संपूर्ण चौकशी करीत आहेत, अशी माहिती उपविभागीय पोलिस अधीक्षक अण्णासाहेब जाधव आणि पोलिस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी दिली आहे.
पूर्वीही झाली मारहाण
काही दिवसांपूर्वी सनी पवार याचे शहरातील जुनैद पठाण नावाच्या तरुणासोबत भांडण झाले होते. यावेळी जुनैदने केवळ रागाने का पाहिले असे कारण पुढे करत सनीने बेदम मारहाण केली होती. याप्रकरणी 3/ 7/2022 रोजी जुनैदकडून कर्जत पोलिस स्थानकात तक्रार दाखल केली होती. यावेळी सनीवर भादवि कलम 324, 323, 504 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्याचा राग काढण्यासाठीच गुरुवारी रात्री हा हल्ला झाल्याचे दुसऱ्या बाजूकडून सांगण्यात येत आहे.
एफआयआरमध्ये काय?
अमित राजेंद्र माने यांनी दिलेल्या फिर्यादीमध्ये म्हटला आहे की, सनी पवार व मी शहरातील अक्काबाई नगर परिसरामध्ये राशीन येथे अण्णाभाऊ साठे जयंती कार्यक्रमास जाण्यासाठी थांबलो होतो. मात्र, त्या ठिकाणी दहा ते पंधरा तरुणांनी हातामध्ये गज काठ्या हॉकीची स्टिक तलवार यांच्या साह्याने आमच्यावर हल्ला केला. यामध्ये सनी पवार यांच्या डोक्यास गंभीर दुखापत झाल्याने नगर येथे उपचारासाठी नेण्यात आले आहे. हल्लेखोर पांढऱ्या रंगाची स्विफ्ट कार व बुलेट पल्सर व इतर वाहनांवर आले होती. यावेळी त्यांनी जातीय वाचक शिवीगाळ केली. तुला हिंदू धर्माचा खूप कीडा आला आहे का, असे म्हणून शिवीगाळ केली. हातातील तलवारीने वार केले व तू सारखे सोशल मीडियावर आय सपोर्ट नपुर शर्मा असे स्टेटस ठेवत असतो व इंस्टाग्राम वरही टाकत असतो, असे म्हणून तुझा आम्ही उमेश कोल्हे करू, असे म्हंटले आहे. यावरून शाहरुख खान पठाण, सोहेल पठाण, निहाल खान पठाण, इलाईल शेख, टिपू पठाण, आबरार उर्फ अरबाज कासम पठाण, हर्षद पठाण, अकीब सय्यद व इतर पाच ते सात अनोळखी व्यक्तींविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे.
कर्जतमध्ये घटनेचे प्रतिसाद
घटनेनंतर विविध हिंदुत्ववादी संघटनांनी निषेध करीत शुक्रवारी कर्जत बंद ची हाक दिली होती. त्यानुसार तरुणांनी शहरातून मोर्चा काढून पोलिस निरीक्षक यांना निवेदन दिले. यावेळी पत्रकारांना माहिती देताना दलित महासंघाचे जिल्हाध्यक्ष संजय चांदणे, हिंदुराष्ट्र सेना जिल्हाध्यक्ष संजय आडोळे, भाजप प्रदेश कार्यकारिणी सदस्य अनुसूचित आघाडी सेलचे कार्यकारिणी सदस्य पंडित वाघमारे, यांनी सांगितले की ही घटना निंदनीय आहे. याप्रकरणी संबंधित आरोपींना तात्काळ अटक करून नुपूर शर्माच्या संदर्भात जो देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी केली आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.