आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बनवाबनवी:सोन्याच्या बनावट दागिन्यांवर हॉलमार्कचे शिक्के ; शहर बँकेतील बनावट सोनेतारण प्रकरणाला वेगळे वळण

नगर25 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

शहर सहकारी बँकेतील बनावट सोनेतारण घोटाळ्याच्या तपासात धक्कादायक माहिती समोर आली आहे. बेन्टेक्सच्या दागिन्यांवर हॉलमार्क शिक्का मारून ते खरे असल्याचे भासवले जात होते. त्यासाठी वापरले जाणारे मशिनही कोतवाली पोलिसांनी केडगाव येथून जप्त केले आहे. त्यामुळे सदरचे बनावट दागिने हे फक्त बँकांमध्ये कर्ज प्रकरणासाठी वापरले जात होते की बाजारातही याची विक्री झाली, असा सवाल उपस्थित होत आहे. दरम्यान, या गुन्ह्यात अटकेतील आरोपींची संख्या सहावर पोहचली.

बँकेचे व्यवस्थापक दिनेश कुलकर्णी यांनी बनावट सोनेतारण प्रकरणी २६.७० लाखांची फसवणूक झाल्याची तक्रार पोलिसात दिली आहे. बँकेच्या पॅनेलवरील गोल्ड व्हॅल्युअर अजय किशोर कपाले (रा. बालिकाश्रम रोड), विशाल संजय चिपाडे (रा. चिपाडे मळा, सारसनगर), ज्ञानेश्‍वर रतन कुताळ (रा.चिपाडे मळा, सारसनगर) व सुनील ज्ञानेश्‍वर अळकुटे (रा. तपोवन रोड) यांना याप्रकरणी अटक करण्यात आली होती. आता श्रीतेज रमेश पानपाटील (रा.भिंगार) व संदीप सीताराम कदम (रा. नगर) या दोघांनाही पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे. तपासात पोलिसांनी हॉलमार्गचे शिक्के मारणारी मशीन ताब्यात घेतली आहे. मुळात ही मशिन आरोपींकडे आली कशी, बनावट दागिने फक्त बँकांमध्येच वापरले गेले की, बाजारातही विक्री झाली याचा शोध घेण्याचे आव्हान पोलिसांसमोर आहे.

आरोपींशी संबंधित इतर बँकांचे व्यवहार रडारवर
आरोपींनी इतरही बँकांमध्ये अशाप्रकारे फसवणुकीचे प्रकार केले असण्याची शक्यता असल्याने पोलिसांनी त्यादृष्टीने तपास सुरू केला आहे. सदर प्रकरणातील प्रमुख सूत्रधार पानपाटील व व्हॅल्यूअर कपाले यांच्याशी संबंधित इतर व्यवहारांची माहितीही पोलिस घेत आहेत. दरम्यान, सदरचे प्रकरण वडकीस आल्यानंतर शहरातील इतर बँका व पतपेढ्यांचे दाबे दणाणले आहेत.

बनावट सोनेतारण प्रकरणाचा सर्व बाजूने तपास सुरू
शहर बँकेतील बनावट सोनेतारण प्रकरणाचा तपास सुरू आहे. यात बनावट दागिन्यांवर हॉलमार्कचा शिक्का मारणारी मशीन पोलिसांकडून जप्त करण्यात आली आहे. शहरातील इतरही काही बँकांमध्ये असे फसवणुकीचे प्रकार घडले असण्याची शक्यता नाकारता येत नाही. या मशीनद्वारे शिक्के मारलेले दागिने कुठे वापरण्यात आले, याचाही शोध पोलिसांकडून घेतला जात आहे.''
संपतराव शिंदे, पोलिस निरीक्षक, कोतवाली पोलिस ठाणे.

फसवणुकीची रक्कम दीड कोटी रुपयांवर ?
आरोपींकडील तपासामधून इतर आणखी १८ ते २० बनावट सोनेतारण खात्यांची माहिती पोलिसांना मिळाली आहे. त्यामुळे फसवणुकीची रक्कम सुमारे १.४९ कोटींवर पोहचण्याची शक्यता आहे. या कर्ज खात्यांबाबतची माहिती पोलिसांनी बँकेकडून मागवली आहे. बँकेकडून अहवाल आल्यानंतरच फसवणुकीचा अधिकृत आकडा समोर येणार असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.

केडगावात सुरु होता प्रकार
पोलिसांनी आरोपीच्या घर व दुकानांची झडती घेतली. यात केडगाव येथील लिंक रोडवरील एका गाळ्यातून पोलिसांनी बनावट दागिन्यांवर हॉलमार्कचा शिक्का मारणारी मशिनच ताब्यात घेतली आहे.

बातम्या आणखी आहेत...