आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अहमदनगरला मुसळधार पावसाने झोडपले:3 तासांच्या पावसाने शहरात उडवली दाणादाण; आतापर्यंत 475 मिलिमीटर पावसाची नोंद

अहमदनगर17 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

अहमदनगर शहर व परिसराला सोमवारी दुपारी मुसळधार पावसाने अक्षरशः हा झोडपून काढले आहे. शहरात तीन तास सुरू असलेल्या मुसळधार पावसाने दाणादाण उडवली आहे. दरम्यान अहमदनगर जिल्ह्याच्या सर्व तालुक्यात यंदा सरासरीपेक्षा अधिक पावसाची नोंद झाली असून, आतापर्यंत 475 मिलिमीटर पाऊस झाला आहे.

अहमदनगर शहर व परिसरात दुपारी 1 वाजता पावसाला सुरुवात झाली. दुपारी 1 ते 3 वाजेपर्यंत शहरासह उपनगरांमध्ये मुसळधार पाऊस सुरू होता. अहमदनगर शहरातील दिल्ली गेट,माळीवाडा, सर्जेपुरा, चौपाटी कारंजा, मिस्कीनमळा रोड, तेली खुंट, कोठला या शहरातील भागासह उपनगरातील सावेडी, पाईपलाईन रोड, एकविरा चौक, भिस्तबाग चौक, भिंगार ,केडगाव ,नवनागापूर या भागाला मुसळधार पावसाने झोडपून काढले आहे. मुसळधार पावसामुळे शहराअंतर्गत असलेले पावसाच्या पाण्याखाली गेले होते.

सोमवारी आठवड्याचा पहिला दिवस असल्यामुळे सर्व सरकारी कार्यालयाबरोबरच, शालेय विद्यार्थ्यांची शाळा, महाविद्यालयात जाण्याची लगबग असतानाच या पावसाने हजेरी लावल्यामुळे मोठे हाल झाले. जिल्ह्याच्या ग्रामीण भागात देखील पावसाने जोरदार हजेरी लावली आहे.

मुसळधार पावसामुळे विहिरी, कुपनलिका, बंधारे ओसंडून वाहू लागली आहेत. शहराच्या उपनगरामध्ये काही भागात विजेच्या कडकडाट्यांसह पाऊस झाला. जिल्ह्यात आतापर्यंत 475 मिलिमीटर पाऊस झाला असून,गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा सर्वच तालुक्यांत सरासरीपेक्षा अधिक पाऊस झाला आहे.

दरम्यान संततधार व मुसळधार पावसामुळे अहमदनगर जिल्ह्यातील भंडारदरा, मुळा ,निळवंडे या प्रमुख धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू आहे. मुळा धरणाच्या लाभ क्षेत्रात पावसाचा जोर असल्याने या धरणातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू झाल्याने नदीकाठच्या गावांना सोमवारी प्रशासनाने सतर्कतेचे आदेश दिले आहेत.

मुसळधार पावसामुळे पिकांचे नुकसान

संततधार व मुसळधार पावसामुळे ग्रामीण भागात पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून, अहमदनगरच्या उत्तर जिल्ह्यात अति पावसामुळे पिके पाण्याखाली गेली आहेत. पावसामुळे नुकसान झालेल्या पिकाचे पंचनामे करण्याचे निर्देश जिल्हा प्रशासनाने स्थानिक प्रशासनाला दिले आहेत. पंचनामे नंतर त्याचा अहवाल राज्य सरकारला सादर केला जाणार आहे.

बातम्या आणखी आहेत...