आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुसळधार पाऊस:नगर शहर व परिसराला मुसळधार पावसाने तीन तास झोडपले

नगर22 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर शहर व परिसराला सोमवारी दुपारी मुसळधार पावसाने झोडपून काढले. शहरात तीन तास सुरू असलेल्या मुसळधार पावसाने दाणादाण उडवली आहे. दरम्यान, नगर जिल्ह्याच्या सर्व तालुक्यात यंदा सरासरीपेक्षा अधिक पावसाची नोंद झाली. आतापर्यंत ४७५ मिलिमीटर पाऊस झाला आहे.नगर शहर व परिसरात सोमवारी दुपारी १ वाजता पावसाला सुरुवात झाली. दुपारी १ ते ३ वाजेपर्यंत शहरासह उपनगरांत मुसळधार पाऊस सुरू होता. नगर शहरातील दिल्ली गेट,माळीवाडा, सर्जेपुरा, चौपाटी कारंजा, मिस्कीनमळा रोड, तेली खुंट, कोठला या शहरातील भागासह उपनगरातील सावेडी, पाइपलाइन रोड, एकविरा चौक, भिस्तबाग चौक, भिंगार, केडगाव, नवनागापूर या भागाला मुसळधार पावसाने झोडपून काढले. मुसळधार पावसामुळे शहरांतर्गत असलेले रस्ते पावसाच्या पाण्याखाली गेले होते.

सोमवारी आठवड्याचा पहिला दिवस असल्यामुळे सर्व सरकारी कार्यालयाबरोबरच, शालेय विद्यार्थ्यांची शाळा, महाविद्यालयात जाण्याची लगबग असतानाच या पावसाने हजेरी लावल्यामुळे मोठे हाल झाले. जिल्ह्याच्या ग्रामीण भागात देखील पावसाने जोरदार हजेरी लावली. मुसळधार पावसामुळे विहिरी, कुपनलिका, बंधारे ओसंडून वाहू लागली आहेत.

शहराच्या उपनगरामध्ये काही भागात विजेच्या कडकडाट्यांसह पाऊस झाला. जिल्ह्यात आतापर्यंत ४७५ मिलिमीटर पाऊस झाला आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा सर्वच तालुक्यांत सरासरीपेक्षा अधिक पाऊस झाला आहे. दरम्यान, संततधार व मुसळधार पावसामुळे नगर जिल्ह्यातील भंडारदरा, मुळा ,निळवंडे या प्रमुख धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू आहे. मुळा धरणाच्या लाभ क्षेत्रात पावसाचा जोर असल्याने या धरणातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू झाल्याने नदीकाठच्या गावांना सोमवारी प्रशासनाने सतर्कतेचे आदेश दिले आहेत.

संगमनेर तालुक्यातील दोन गावांचा संपर्क तुटला
संगमनेर तालुक्याच्या पठार भागातील कोठे, वनकुटे व बोरबन गावात सोमवारी दुपारी ३ वाजेच्या सुमारास ढगफुटी सदृश्य पाऊस झाल्याने सर्वत्र पाणीच पाणी झाले. कोठे-घारगाव या दोन गावांना जोडणारा मुक्ताई पूल पाण्याखाली गेल्याने संपर्क तुटला. तर शेतात पाणी साचल्याने पिकांचे नुकसान झाले. ओढे-नाले भरून वाहू लागल्याने अनेक छोटे-मोठे पूल पाण्याखाली होते. या पावसाने नागरिकांची धांदल उडाली. बोरबन येथे रस्त्यावर मातीचा खच वाहून आल्याने रस्ता बंद होता.

बातम्या आणखी आहेत...