आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अहमदनगर जिल्ह्यात पुढील तीन दिवस अतिवृष्टीचा इशारा:नागरिकांनी सुरक्ष‍ित स्थळी स्थलांतर करा, प्रशासनाचे सतर्कतेचे आदेश

अहमदनगर20 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

अहमदनगर जिल्ह्याच्या काही भागात शुक्रवारी गणेश विसर्जनाच्या दिवशी देखील जोरदार पाऊस झाला आहे. जिल्ह्यात आतापर्यंत 99 टक्के पावसाची नोंद झाली असून, पुढील तीन दिवसात जिल्ह्यात अतिवृष्टीचा इशारा भारतीय हवामान विभागाने दिला आहे.

या पार्श्वभूमीवर सखल भागात राहणाऱ्या नागरिकांनी तातडीने सुरक्ष‍ित स्थळी स्थलांतर करावे. असे आवाहन जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रभारी निवासी उपजिल्हाधिकारी पल्लवी निर्मळ यांनी शुक्रवारी केले आहे.

या कालावधीत अतिवृष्टीचा इशारा

भारतीय हवामान विभागाने जिल्ह्यात 9 ते 11 सप्टेंबर या कालावधीत अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. अहमदनगर जिल्ह्यातून वाहणाऱ्या गोदावरी नदीत नांदुरमधमेश्वर बंधाऱ्यातून शुक्रवारी दुपारी 11 हजार 906 ,भिमा नदीत दौंड पूल येथून 19 हजार 408, घोडनदीत घोड धरणातून 19 हजार 140,प्रवरा नदीत भंडारदरा धरणातून 814, मुळा धरणातून मुळा नदी पात्रात 20 हजार क्यूसेसने पाण्याचा विसर्ग सुरू आहे.

सुरक्ष‍ित स्थळी स्थलांतर करा

विसर्ग आणखी वाढण्याची शक्यता गृहीत धरून जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाकडून अहमदनगर जिल्ह्यातील नागरिकांना अतिदक्षतेचा इशारा देण्यात आला आहे. सखल भागात राहणाऱ्या नागरिकांनी तात्काळ सुरक्ष‍ित स्थळी स्थलांतर करावे. असे आवाहन निर्मळ यांनी केले आहे.

सूचनांचे पालन करा

अहमदनगर जिल्ह्यात शुक्रवार अखेरपर्यंत 447 मिलिमीटर (99.9 टक्के) पाऊस झाला आहे. धरणांच्या पाणलोट क्षेत्रामध्ये पावसाचा जोर वाढण्याची शक्यता गृहीत धरून धरणांच्या पाणीसाठ्यात वाढ होऊन पर्यायाने नदीपात्रातील विसर्गात देखील वाढ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे नदीकाठच्या भागातील नागरिकांनी स्थानिक प्रशासनाद्वारे दिलेल्या सूचनांचे पालन करावे.

नदी-नाल्यांपासून दूर राहा

नदी, ओढे व नाल्याकाठच्या नागरिकांनी दक्ष रहावे. पाणीपातळीत वाढ होत असल्यास नदीपात्रापासून तसेच ओढे व नाले यापासून दुर रहावे व सुरक्ष‍ित स्थळी स्थलांतर करावे. असे आवाहन निर्मळ यांनी केले आहे.

टोल फ्री 1077 क्रमांकावर संपर्क करा

धोकादायक ठिकाणी सेल्फी काढू नये.विजेचा कडकडाट होत असताना झाडांच्या खाली न थांबता सुरक्ष‍ित ठिकाणी आश्रय घ्यावा. नागरिकांनी आपत्कालीन परिस्थितीत नजीकचे तहसील कार्यालय, पोलीस स्थानक यांचेशी संपर्क साधावा. तसेच जिल्हा नियंत्रण कक्ष, जिल्हाधिकारी कार्यालय अहमदनगर येथील दूरध्वनी क्र. 1077 (टोल फ्री), 0241-2323844 या क्रमांकावर संपर्क साधावा. असे आवाहनही पल्लवी निर्मळ यांनी केले आहे.

बातम्या आणखी आहेत...