आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

गाव तसं चांगलं...:इतना सन्नाटा क्यों है भाई? ‘आदर्श’ हिवरे बाजारात निवडणुकीचे सुतक

हिवरे बाजार4 महिन्यांपूर्वीलेखक: दिप्ती राऊत
  • कॉपी लिंक

१४ हजार गावांमध्ये ग्रामपंचायत निवडणुकीचा धुरळा उडाला आहे. कुठे सरपंचपदासाठी काेट्यवधींची बाेली लावली जात आहे, तर कुठे प्रस्थापितांनी इतरांची बाेलती बंद केली आहे. यापैकी राज्यभरातील लक्षवेधी गावांमधील निवडणुकांची आतली बातमी सांगणारी ही विशेष वृत्तमालिका. थेट या पारावर जाऊन ‘दिव्य मराठी’च्या प्रतिनिधींनी मांडलेले वास्तव...

स्वच्छ सफेद सिमेंटचे गुळगुळीत रस्ते, दुतर्फा पेव्हर ब्लॉक्स, “ग्रामसंसद’, “ग्रामसंवाद’च्या भल्या मोठ्या इमारती, हनुमानाच्या मंिदरापुढे भव्य दगडी बांधकाम, विस्तीर्ण पार... मात्र, सर्वत्र स्मशानशांतता पसरलेली. संध्याकाळी सहाची वेळ, पण अख्खा गाव सुना सुना. ना पारावर गप्पा, ना चौकात गर्दी. हे चित्र आहे, “आदर्श’तेबद्दल असंख्य पुरस्कार पटकावणाऱ्या, देशभर गाजलेल्या “हिवरे बाजार’चे आणि याचे कारण आहे, तब्बल तीस वर्षांनी गावात प्रथमच होत असलेल्या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीचे.

इतरत्र निवडणुका सुरू असलेली गावं उत्साहाने सळसळताना दिसताहेत. चावडीवरच्या टोप्यांची हालचाल होतेय, वेशीवरच्या गाड्यांची लगबग वाढलीय. मात्र, ग्रामविकासाचा “आदर्श’ निर्माण केल्याबद्दल प्रसिद्ध असलेल्या अहमदनगर जिल्ह्यातील हिवरे बाजारात कमालीचा सन्नाटा पसरला आहे. शेती सुधारल्यामुळे सगळे जण मळ्यात राहायला गेल्याने गावात शांतता दिसत असल्याचे एक जण म्हणाला. पण पहिल्यांदाच निवडणूक होतेय, त्याबद्दल मतदार म्हणून, गावकरी म्हणून तुम्हाला काय वाटतं, हे विचारताच सगळे गप्प होतात. ९१० मतदार संख्या असलेल्या या गावात ६० टक्क्यांहून अधिक तरुण आहेत, ज्यांना पंचायतीच्या निवडणुकीत आतापर्यंत एकदाही मतदान करण्याची संधी मिळाली नाही. पण निवडणुकीचा विषय काढताच ते बोलणं थांबवून आपल्या वाटेनं निघून जातात.

“निवडणूक ही तर लोकशाहीची ताकदच आहे’, पद्मश्री पुरस्कार विजेते, राज्याच्या आदर्श ग्राम अभियानाचे कार्याध्यक्ष आणि हिवरे बाजारचे विद्यमान उपसरपंच पोपटराव पवार सांगत होते. जात प्रमाणपत्राचा गोंधळ झाल्याने गेेली पाच वर्षे हिवरे बाजारचे सरपंचपद रिक्त राहिल्याने पोपटरावच उपसरपंच म्हणून कारभार करीत होते.

१९८९ मध्ये तरुण पोपटरावांची गावाने अविरोध सरपंच म्हणून निवड करून दिली. तेव्हापासून गेली ३० वर्षे पोपटरावांचे गाव म्हणून हिवरे बाजारला ओळख मिळाली. यंदा प्रथमच “परिवर्तन’ पॅनलने आव्हान दिल्याने हिवरे बाजारात निवडणुका होत असून स्वत:च निवडणुकीच्या रिंगणात असलेल्या पोपटरावांची प्रतिष्ठा अनेक बाजूंनी पणाला लागली आहे.

बातम्या आणखी आहेत...