आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गाैरव:गीतेच्या प्रचारासाठी मालपाणी यांनी केलेल्या कामाचा सन्मान

संगमनेर2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

तीन दशकांपासून वैश्‍विक पातळीवर गीतेचा प्रचार-प्रसार करून विविध उपक्रमांच्या माध्यमातून जगभरातील लाखो साधकांना गीतेतील जीवनमूल्यांचा परिचय देणारे आणि गीतेतील तत्त्वज्ञानाचा सार असलेल्या पासष्ट पुस्तकांचे लिखाण करणारे गीता परिवाराचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष डॉ. संजय मालपाणी यांना प्रतिष्ठेचा समजला जाणारा ‘गीता गौरव’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.

लोकमान्य टिळकांच्या प्रेरणेतून ९८ वर्षांपूर्वी पुण्यात स्थापन झालेल्या गीताधर्म मंडळाच्या वतीने दरवर्षी हा पुरस्कार देण्यात येतो. सोमवारी पुण्यात झालेल्या शानदार सोहळ्यात मंडळाचे अध्यक्ष प्रा. डॉ. मुकुंद दातार यांच्या हस्ते डॉ. मालपाणी यांना ‘गीता गौरव’ पुरस्कार देण्यात आला. मंडळाचे कार्याध्यक्ष विनया मेहेंदळे, प्राचार्य मुकुंद कोंढवेकर, प्रिती गंगाखेडकर व गीता प्रेमी यावेळी उपस्थित होते.

राष्ट्रसंत तथा श्रीराम जन्मभूमी न्यासाचे खजिनदार स्वामी गोविंददेव गिरि महाराज व उद्योगपती (स्व) ओंकारनाथ मालपाणी यांच्या प्रेरणेतून स्थापन झालेल्या गीता परिवाराच्या माध्यमातून मालपाणी ३६ वर्षांपासून गीतेच्या प्रचार व प्रसारासाठी काम करत आहेत. गीतेच्या प्रचारासाठी त्यांनी अभिनव संकल्पनेतून गीता, संस्कार व योग महोत्सवात त्यांनी गीतेतील तत्त्वज्ञान आणि जीवनमूल्यांचा परिचय करुन दिला.

गीतेतील जीवनसार सहज व सुलभ भाषेत समजावेत, यासाठी आजवर डॉ. मालपाणी यांनी ६५ पुस्तकांचे लिखाण केले. गीतेवर आधारित योगेश्‍वर आणि विजयध्वज या महानाट्यांची प्रस्तुती केली. कोरोनात जनजीवन ठप्प झाले असताना गीता परिवाराने ‘लर्न गीता’ हा ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरील अनोखा उपक्रम जगभरातील १३६ देशात राबविला. पहिल्यांदाच बारा भाषांमधून ५ लाखाहून अधिक साधकांना गीता पठणाचे शास्त्रोक्त प्रशिक्षण देण्याचे कार्य त्यांच्या मार्गदर्शनाखाली केले गेले.

संस्कृत उच्चार सुलभ व्हावे, यासाठी त्यांच्या प्रेरणेतून गीता परिवाराने नवी पद्धतीही विकसित केली. त्यातून हजारो विद्यार्थ्यांच्या मनात संस्कृत विषयक आकर्षण निर्माण झाले. कोरोनात सुरु केलेले गीता पठण प्रशिक्षण आजही सुरु आहे. गीतेचे दैनंदिन जीवनात कसे अनुसरण करावे, याबाबत डॉ. मालपाणी यांनी व्याख्याने दिली. यु-ट्यूबवर असलेल्या त्यांच्या व्याख्यानांना लाखो श्रोत्यांची पसंती मिळते. या माध्यमातून त्यांनी गीता विशारद उपाध्या प्राप्त केल्या आहेत.

हजारो सदस्यांच्या समर्पित योगदानाचा प्रसाद
श्रीमद् भगवद्गीता हा केवळ श्रीकृष्ण-अर्जुन यांच्यात झालेला रणांगणावरील संवाद नसून तो अखिल मानवजातीच्या जीवनमूल्यांचा सार आहे. मानवाचे संपूर्ण जीवन गीतेतील तत्त्वज्ञानावर आधारित आहे. त्याच्या प्रचार व प्रसारासाठी पूज्य स्वामी गोविंददेव गिरिजी महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यरत असलेल्या गीता परिवाराच्या हजारो सदस्यांच्या समर्पित योगदानाला प्राप्त झालेला हा प्रसाद असल्याची प्रतिक्रिया डॉ. संजय मालपाणी यांनी दिली.

बातम्या आणखी आहेत...