आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Ahmednagar
  • If There Is Tacit Consent To The Extravagance Of The Factories, How Can Sugarcane Get A Price; Question By Raju Shetty, Founder President Of Swabhimani Shetkar Sangathan| Marathi News

ऊस परिषद:कारखानदारांच्या उधळपट्टीला मूकसंमती असेल, तर उसाला भाव कसा मिळणार; स्वाभीमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राजू शेट्टी यांचा सवाल

राहुरीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

उसाच्या दरात एकेकाळी पश्चिम महाराष्ट्रात पुढे असलेल्या नगर जिल्ह्यातील उसाला आज खर्चाच्या तुलनेत मिळणारा कमी भाव हा दुर्दैवी ठरला असून ऊस तोडणीच्या नावाखाली खर्च दाखवणाऱ्या तसेच रिकव्हरी चोरून उसाच्या वजनात काटामारी करणाऱ्या साखर कारखानदारांच्या उधळपट्टीला शेतकऱ्यांची मूकसंमती असेल, तर उसाला दर कसा मिळणार? हा सवाल स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राजू शेट्टी यांनी केला.

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष रवी मोरे यांच्या नेतृत्वाखाली राहुरी तालुक्यातील टाकळीमिया येथे मंगळवारी सायंकाळी आयोजित ऊस परिषदेत ते बोलत होते. शेट्टी म्हणाले, राहुरीला पहिली ऊस परिषद झाली. या परिषदेला चरणसिंग व शरद पवार उपस्थित होते. चळवळीचा जिल्हा म्हणून संपूर्ण देशभरात ओळख असलेल्या नगर जिल्ह्यात उसाला मिळणारा कमी बाजारभाव हा दुर्दैवी ठरला. कारखानदाराकडून रिकव्हरी चोरली जात असल्याने उसाला बाजारभाव मिळत नाही. गेटपास न घेता रात्री-अपरात्री साखर कुठे जाते, हा शोध घेतल्यास साखर बाजारभाव कमी देणाऱ्या कारखानदाराचे पितळ उघडे पडेल. किमान वेतनाच्या कायद्याप्रमाणे शेतमालाला किमान हमीभाव कायदा मंजूर करून कमी किमतीत खरेदी करणारे तुरुंगात जातील ही तरतूद करण्यात यावी, असा कायदा २०२४ मध्ये केल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही, असे शेट्टी यांनी म्हटले.

जालिंदर पाटील म्हणाले, उसला एकरी नव्वद हजार रुपये लागवड खर्च होत असताना राहुरीत २१०० रुपये प्रतिटनाप्रमाणे मिळणारा बाजारभाव हा डोके सुन्न करणारा आहे. ठरावीक लोकांमुळे राजकीय साखर सम्राटाची मुजोरी वाढली. संदीप जगताप म्हणाले, संजीवनी साखर कारखाना उसाला २७०० रुपये प्रतिटन बाजारभाव देत असताना राहुरीतील कारखान्याची २१०० रुपये प्रतिटन भावाची परंपरा कधी थांबणार? असा सवाल त्यांनी केला. रवी मोरे म्हणाले, राहुरी तालुक्यात २० वर्षांपूर्वी उसाला २१०० रुपये प्रतिटन बाजारभाव मिळाला होता. आजही उसाला तेवढाच भाव देऊन शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसणाऱ्यांना कुठलीही शरम वाटत नाही. यावेळी सुनील लोंढे, बाबासाहेब तरडे, दत्तात्रय आढाव, अनिल निकम, करपे यांची भाषणे झाली. प्रास्ताविक बाळासाहेब जाधव यांनी केले. आभार गुलाब निमसे यांनी मानले. यावेळी बाळासाहेब जाधव, सुभाष करपे, ज्ञानदेव निमसे, भागवत नवाळे, पिंटू साळवे, प्रकाश देठे, संतोष चोळके आदी उपस्थित होते.

संघर्षासाठी तयार रहावे
जगभरातील साखर कारखानदारी कुठे चालली, हा विचार करण्याची गरज असून साखर कारखानदाराचा माज उतरवण्याची खरी वेळ आली. उसापासून मिळणारे बायोप्रॉडक्ट हा आत्मा आहे. २५०० वर्षांचा उसाचा इतिहास आहे. उसाला पाच हजार रुपये प्रतिटन बाजारभाव मिळाल्याशिवाय उसाची शेती परवडत नाही. त्यासाठी संघर्ष करायला तयार व्हा, असे जालिंदर पाटील यांनी सांगितले.

बातम्या आणखी आहेत...