आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नशेच्या गोळ्या:राहुरीत एक कोटी रुपयांचा अवैध औषधांचा साठा जप्त ;रॅकेट उघडकीस येण्याची शक्यता

राहुरी8 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

गर्भपात, नशा, निद्रा, मादक द्रव्य व इतर औषधांच्या गोळ्या व सिरप असा सुमारे एक काेटी रुपये किंमतीचा अवैध औषधाचा साठा राहुरीत सापडल्याने खळबळ उडाली आहे. याप्रकरणी राहुरीतील चौघांना पोलिसांनी ताब्यात घेतले. यामध्ये राहुरीतील एका चहा विक्रेत्याचा समावेश असल्याची चर्चा घटनास्थळी सुरू होती.राहुरी बारागाव नांदूर रस्त्यालगत असलेल्या दुकान गाळ्यात औषधाचा हा अवैध साठा सापडला. निनावी खबरीवरून माहिती मिळाल्याने पोलिस तसेच अन्न भेसळ व औषधे प्रशासनातील अधिकाऱ्यांनी घटनास्थळी छापा टाकून दुकान गाळ्यातील नशेच्या व झोपेच्या गोळ्या, गर्भपाताची औषधे, मादक पदार्थ असा लाखो रुपयांचा साठा ताब्यात घेतला.

औषधाच्या बाटल्या व गोळ्याच्या पाकिटाचे मोजमाप व पंचनाम्याचे काम बुधवारी सायंकाळी उशिरापर्यंत सुरू होते. पोलिस अधिकारी व कर्मचारी तसेच औषधे व अन्नभेसळ प्रशासनातील अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत औषधाच्या अवैध साठ्याचा पंचनामा करून मुद्देमाल ताब्यात घेण्यात आला. याप्रकरणी राहुरी पोलिसांनी चौघांना ताब्यात घेतले. राहुरी बारागाव नांदूर रस्त्यालगतच्या दुकान गाळ्यात मादक व गर्भपाताच्या औषधाची विक्री सुरू असताना पोलिस तसेच औषधे व अन्नभेसळ प्रशासनाला गेली पाच महिने साधी भणक लागली नाही? याबाबत आश्चर्य व्यक्त केले जात आहे. वाळू तस्करी, रस्ता लूट, मोटरसायकल चोरी या गुन्हेगारीच्या घटनात अव्वल म्हणून राहुरी बारागाव नांदूर मार्गाची ओळख असून या रस्त्यालगतच्या गाळ्यात गर्भपात व मादक औषधाचा लाखो रुपयांचा अवैध साठा बुधवारी सापडल्याने या अवैध व्यवसायास पाठबळ कुणाचे? असा सवाल चर्चेत आहे.

मोठे रॅकेट उघडकीस येण्याची शक्यता
औषधांचा साठा करून काळ्या बाजारात विक्री करणारे मोठे रॅकेट असण्याची शक्यता आहे. औषधे विक्रीसाठी कुणा कुणाकडे गेली? याची चौकशी होणे गरजेचे आहे. तीन दिवसांपूर्वी औरंगाबाद जिल्ह्यात अशाच औषधाचा अवैध साठा सापडला असून बुधवारी राहुरी सापडलेल्या अवैध औषध साठ्याचे कनेक्शन या घटनेशी संलग्न असल्याचा संशय व्यक्त होत आहे.

बातम्या आणखी आहेत...