आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गुन्हेगारी:गर्भपाताच्या गोळ्यांचा हरियाणातून नगरमध्ये होतोय बेकायदेशीर पुरवठा; छाप्यात तब्बल 9 हजार गोळ्या जप्त

नगर2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

हरियाणा राज्यातून नगर शहरात गर्भपाताच्या गोळ्यांचा पुरवठा होत असून, एमआयडीसी पोलिस व अन्न, औषध प्रशासनाच्या छापेमारीत तब्बल ९ हजार गोळ्यांचा साठा जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात संबंधित एजन्सी चालक व हरियाणा येथील कंपनीच्या सर्व संचालकांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती सहाय्यक पोलिस निरीक्षक युवराज आठरे यांनी दिली. अन्न व औषध प्रशासनाचे सहाय्यक आयुक्त ज्ञानेश्वर मोहन दरंदले यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. एमआयडीसी येथील व्हीआरएल लॉजिस्टिक्स या ट्रान्सपोर्ट कंपनीमध्ये एमआयडीसी पोलिसांनी औषध निरीक्षक जावेद शेख यांच्यासमवेत ५ मे रोजी तपासणी केली. यात गर्भपातासाठी मी वापरल्या जाणाऱ्या ‘अवॉर्ट किट’ची १८०० पाकिटे म्हणजेच ९ हजार गोळ्या आढळून आल्या. अन्न व औषध प्रशासनाने हे नमुने तपासणीसाठी घेऊन उर्वरित साडेसात लाख रुपयांचा माल पोलिसांनी जप्त केला.

ही औषधे हरियाणा येथील आयव्हीए हेल्थकेअर प्रा. लि. कंपनीच्या बिलासमवेत श्रीराम एजन्सी, सावेडी या नावाने आलेली आहेत. मात्र बिलावर दर्शवण्यात आलेली औषधांची नावे व प्रत्यक्षात आलेली औषधे यात तफावत असल्यामुळे याची चौकशी करण्यात आली. यासंदर्भात श्रीराम एजन्सीचे मालक नितीन जगन्नाथ बोठे (रा. पंकज कॉलनी, टीव्ही सेंटरजवळ, नगर) यांना नोटीस बजावण्यात आली होती. सदरचा प्रकार संशयास्पद असून, या संदर्भात मोठे रॅकेट कार्यरत असण्याची शक्यता आहे. त्यामुळे याची चौकशी होणे व तपास होणे आवश्यक असल्याने श्रीराम एजन्सीचे बोठे, आयव्हीए हेल्थकेअर हरियाणा या कंपनीचे सर्व संचालक आदींविरोधात तक्रार असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

नगरमध्ये अनेक महिन्यांपासून पुरवठा?
हरियाणा येथे औषधांच्या बेकायदेशीर विक्रीचे मोठे रॅकेट आहे. तेथून देशभरात बेकायदेशीरपणे निर्बंध असलेल्या गोळ्यांची विक्री व पुरवठा केला जातो. नगर शहरात प्रथमच असा मोठा साठा सापडला आहे. कुरिअर व ट्रान्सपोर्टच्या माध्यमातून हा अवैध प्रकार सुरू आहे. त्यामुळे मागील काही महिन्यांपासून नगरमध्ये या गोळ्यांचा पुरवठा झाला असावा, असा संशय व्यक्त होत आहे. त्या दृष्टीने पोलिसांकडून तपास केला जाणार असल्याचे सांगण्यात आले.

राज्यभरात डझनभर गुन्हे; मोठे रॅकेट
गर्भपाताच्या गोळ्यांची बेकायदेशीरपणे विविध माध्यमातून विक्री सुरू आहे. एका ऑनलाईन कंपनीच्या माध्यमातून कपडे व इतर वस्तूंच्या नावाखाली गर्भपाताच्या गोळ्यांची विक्री होत असल्याचे तब्बल १३ गुन्हे राज्यातील विविध जिल्ह्यात मागील आठवडाभरात दाखल झाले आहेत. त्यानंतर नगर शहरातही साठा सापडल्यामुळे गर्भपाताच्या गोळ्यांच्या बेकायदेशीर विक्रीचे मोठे रॅकेट राज्यात कार्यरत असण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

दिलेल्या पत्त्यावर एजन्सीच नाही
मालाच्या बिलावर सावेडी येथील पत्ता दर्शवण्यात आला होता. मात्र प्रत्यक्षात या पत्त्यावर कोणतीही एजन्सी नसल्याचे चौकशीत समोर आले. एजन्सीच्या लायसन्स नंबरवरून पत्ता शोधण्यात आल्यानंतर या एजन्सीचा पत्ता हा पटवर्धन चौकात एका इंटरनेट कॅफेचा दर्शविण्यात आला. मात्र, त्या जागेवरही सध्या संबंधित इमारत नसून ती नष्ट करण्यात आलेली आहे. बोठे हा घरातूनच विनापरवाना व्यवसाय करत असल्याचे समोर आले आहे.

बिलावर दुसऱ्या गोळ्यांची नावे असल्याने संशय
गर्भपाताच्या जप्त करण्यात आलेल्या गोळ्या वैद्यकीय सल्ल्याशिवाय व परवानगीशिवाय विकण्यास मनाई आहे. नगर मध्ये मोठ्या प्रमाणात साठा आढळल्यानंतर त्याच्या बिलावरील नावे मात्र दुसऱ्याच गोळ्यांची असल्याने संशय बळावला आहे. त्यानुसार सहायक आयुक्त (औषधे) हेमंत मेतकर यांच्या मार्गदर्शनाखाली चौकशी करून पुढील कारवाई करण्यात आली आहे.''
जावेद शेख, औषध निरीक्षक.

बातम्या आणखी आहेत...