आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शासकीय सुट्ट्यांचा रुग्णसेवेवर परिणाम:अहमदनगरचे जिल्हा शासकीय रुग्णालय तिसऱ्या दिवशी बंद, रुग्णांचे अतोेनात हाल

अहमदनगर3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

वातावरण बदलाचा परिणाम आरोग्यावर झाल्याने घराघरात सर्दी, खोकला, तापीचे रुग्ण आढळून येत आहेत. गोरगरिबांसाठी अल्प दरात सेवा पुरवणाऱ्या जिल्हा शासकीय रुग्णालयात सलग सुट्ट्यांमुळे आरोग्यसेवा पूर्णपणे कोलमडून गेली आहे. मंगळवारी पारशी नूतन वर्षानिमित्त जिल्हा शासकीय रुग्णालयात केवळ आपत्कालीन सेवा सुरू होती, उर्वरित सेवा बंद असल्यामुळे रुग्णांचे अतोनात हाल झाले.जिल्ह्याच्या ग्रामीण भागातून उपचारासाठी व तपासणीसाठी येणाऱ्या रुग्णांना अनेक तास ताटकळत उभे राहावे लागले तरी देखील त्यांना सेवा मिळू शकली नाही. त्यामुळे त्यांना परत जावे लागले. दरम्यान एरवी गर्दीने भरलेला जिल्हा शासकीय रुग्णालयातील मुख्य हॉल मंगळवारी रिकामा होता.

स्वाइन फ्लू सदृश्य आजाराचे रुग्ण

गेल्या पंधरा दिवसांपासून व्हायरल फ्लूचे मोठ्या संख्येने रुग्ण आढळून येत आहेत. यात सर्दी खोकल्याचे व तापीचे सर्वाधिक रुग्ण आहेत. त्याचबरोबर स्वाइन फ्लू सदृश्य आजाराचे देखील रुग्ण आढळून येत आहेत. साथीचे रुग्ण मोठ्या संख्येने आढळून येत असल्यामुळे खाजगी हॉस्पिटल, सरकारी रुग्णालयांमध्ये देखील गेल्या काही दिवसांपासून रुग्णांची तपासणीसाठी गर्दी वाढत आहे. अशातच रविवार शासकीय सुट्टी, सोमवार स्वातंत्र्य दिन व मंगळवार पारशी नूतन वर्ष या तीन दिवस सलग सुट्ट्या आल्यामुळे आरोग्य सेवेवरही त्याचा मोठा परिणाम पाहायला मिळाला.

रुग्णालयात सर्वत्र शुकशुकाट

सलग तीन दिवसापासून जिल्हा रुग्णालयातील सर्वसामान्य तपासणी कक्ष बंद आहे. मंगळवारी सकाळपासूनच ग्रामीण भागातून रुग्ण व त्यांचे नातेवाईक उपचारासाठी व तपासणीसाठी जिल्हा रुग्णालयात येत होते. मात्र तेथे केवळ तातडीची वैद्यकीय सेवा सुरू असल्याचे त्यांना सांगण्यात येत होते. बाह्य रुग्ण कक्ष बंद असल्यामुळे अनेक रुग्णांना उपचार व तपासणी न करताच परतावे लागले. जिल्हा रुग्णालयातील बहुतांशी वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या दालनांना कुलूप होते. त्याचबरोबर रुग्णालयात सर्वत्र शुकशुकाट दिसून येत होता.

कोरोना चाचणी कक्षाला कुलूप

जिल्हा शासकीय रुग्णालयातील कोरोना चाचणी कक्षाला ही मंगळवारी कुलूप लावण्यात आलेले होते. अनेक जण कोरोना चाचणीसाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात येत होते कक्षाला कुलूप असल्यामुळे चाचणी न करता त्यांना परतावे लागले.

बातम्या आणखी आहेत...