आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

बिबट्याची दहशत:16 दिवसांत बिबट्याने घेतला तीन बालकांचा बळी, सरकारने जाहीर केली 15 लाखांची मदत

अहमदनगरएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

कोरोनाचे संकट काहीसे कमी झाले नाही तोच अवकाळी पावसाने ग्रामीण भागाला मेटाकुटीस आणले असतानाच जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यात बिबट्याने धुमाकूळ घातला आहे. पाथर्डी तालुक्यात गेल्या १६ दिवसात बिबट्याने तीन बालकांचा बळी घेतल्यानंतर राज्याचे वन मंत्री संजय राठोड यांनी शुक्रवारी या नरभक्षक बिबट्याला जेरबंद करण्याचे फर्मान वनविभागाला सोडले आहे.

पाथर्डी तालुक्यात गेल्या १६ दिवसात बिबट्याने तीन बालकांचा बळी घेतला आहे. पाथर्डी तालुक्यातील तिसगाव भागातील मढी येथे १४ ऑक्टोबरला तीन वर्षाच्या श्रेया सुरज साळवे या बालिकेवर बिबट्याने हल्ला केला त्यात तिचा मृत्यू झाला. २५ ऑक्टोबरला केळवंडी येथे आठ वर्षाच्या सक्षम गणेश आठरे या बालकावर बिबट्याने हल्ला करून त्याला ठार केले. तर गुरुवारी याच तालुक्यातील शिरपूरगाव भागातील पानतासवाडी शिवारात तारकनाथ वस्ती वरील सार्थक बुधवंत या तीन वर्षाच्या मुलाला बिबट्याने पळवून त्याला ठार केले. पाथर्डी तालुक्यात गेल्या १६ दिवसात तीन बालकांचा बिबट्याने बळी घेतल्यानंतर अखेर राज्याचे वनमंत्री संजय राठोड यांनी या भागात दहशत करणाऱ्या बिबट्याला तातडीने जेरबंद करण्याचे निर्देश वनविभागाला दिले आहे. दरम्यान बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यूमुखी पडलेल्या बालकाच्या कुटुंबीयांना पंधरा लाखांची मदत वनमंत्री संजय राठोड यांनी शुक्रवारी जाहीर केली आहे.

नाशिक, जळगाव, यावल येथील पथकाला केले पाचारण

पाथर्डी तालुक्यात दहशत निर्माण करणाऱ्या बिबट्याला जेरबंद करण्यासाठी यावल येथील पथक, जळगाव येथील पथक, नाशिक येथील पथकाला घटनास्थळी पाचारण करण्यात आले असून ,नगर येथील पथक, ट्रॅप कॅमेरे व पिंजरे लावण्याचे जाहीर केले आहे.

आमदार मोनिका राजळे यांनी घेतली जिल्हाधिकाऱ्यांचीभेट

पाथर्डी विधानसभा मतदार संघाचे आमदार मोनिका राजळे यांनी शुक्रवारी दुपारी नगर येथे जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांची भेट घेऊन सदर बिबट्याचा तातडीने बंदोबस्त करावा अशी मागणी केली.

दुष्काळी भागातही बिबट्याचा वावर वाढल्याने दहशत

नगर जिल्ह्यात यापूर्वी संगमनेर, श्रीरामपूर,अकोले या तालुक्यामध्ये नेहमी बिबट्यांचा मुक्तपणे संचार सुरू असतो. या भागात उसाची शेती मोठ्या प्रमाणात असल्यामुळे बिबट्या या भागातील नागरिकांना नवा नसला तरी नगरच्या दक्षिण भागात दुष्काळाची परिस्थिती आहे. त्या भागात देखील बिबट्यांचा वावर वाढला आहे. त्यामुळे या भागात दहशत निर्माण झाली आहे.