आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निवडणुकीची मतमोजणी:अकोल्यात 11 पैकी 9 ग्रामपंचायती मविआकडे

अकोलेएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

तालुक्यातील ११ ग्रामपंचायतींसाठी रविवारी घेतलेल्या निवडणुकीची मतमोजणी मंगळवारी अकोले तहसील कार्यालयात झाली. या निवडणुकीत महाविकास आघाडीतील तथा राष्ट्रवादीचे ९ ग्रामपंचायतीतून सरपंच निवडून आले आहेत असा दावा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार डॉ. किरण लहामटे, अगस्ति साखर कारखान्याचे अध्यक्ष सीताराम गायकर व उपाध्यक्ष अशोक भांगरे, तालुकाध्यक्ष भानुदास तिकांडे यांनी केला. यातील २ ग्रामपंचायतीची निवडणूक बिनविरोध पार पडली. तर भाजपच्या ताब्यातील डोंगरगाव ग्रामपंचायत राष्ट्रवादीने जिंकली.

११ पैकी तब्बल ९ ग्रामपंचायती महाविकास आघाडीतील घटक पक्षांकडे, विशेषत: राष्ट्रवादीकडे आल्यानंतर पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांनी जल्लोष करून गुलालाची उधळण करीत आनंदोत्सव साजरा केला. मंगळवारी मतमोजणीनंतर निकाल जाहीर झाला. चास, आंभोळ, लहित खुर्द, डोंगरगाव, शेंडी, मुरशेत, भंडारदरा या ग्रामपंचायतीतून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सरपंच निवडून आल्याचा दावा राष्ट्रवादीकडून करण्यात आला. तर वाकी, गुहिरे व लहित खुर्द ग्रामपंचायती भाजपाच्या ताब्यात आल्याचा दावा भाजपचे तालुकाध्यक्ष सीताराम भांगरे यांनी केला.

सोमलवाडी ग्रामपंचायतील पार्बताबाई कोडीबा गंभीरे, व शिळवंडी ग्रामपंचायतीत पुनाबाई ज्ञानेश्वर साबळे या बिनविरोध सरपंच झाल्या. तर अतिशय प्रतिष्ठेची ठरलेल्या शेंडी ग्रामपंचायतीत वनिता मनोहर भांगरे, आंभोळ ग्रामपंचायतीत सुशीला जिजाराम खोकले, मुरशेत ग्रामपंचायतीत सखाराम मनोहर आस्वले, चास ग्रामपंचायतीत सुरेखा रामदास शेळके, डोंगरगाव ग्रामपंचायतीत दशरथ माधव उगले, भंडारदारा ग्रामपंचायतीत अनिता विनयाक खाडे व लहित खुर्द ग्रामपंचायतीत अनिता किशोर गोडसे नवनिर्वाचित सरपंच म्हणून निवडून आले.

बातम्या आणखी आहेत...