आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी लक्ष्यवेधी:​​​​​​​कामधंदाच नाही; 529 नवविवाहित जोडपे विभक्तच्या मार्गावर; लॉकडाउनमधेच अडकले होते विवाहबंधनात

नगर2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • संसार पुन्हा फुलवण्यासाठी भरोसा सेलचा प्रयत्न

भिती कोरोनाची नाही...झाला तरी सरकारी यंत्रणेने फुकटात सुरू केलेल्या कोविड सेंटरमध्ये १५ दिवस राहू, बरे होऊ... पण लॉकडाऊनमुळे हातचा रोजगार गेला, त्याचे काय करायचे? स्वतःसह कुटुंबाचं पोट भरायचं कसं? या विवंचनेत सापडलेल्या तब्बल ५२० जोडप्यांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला आहे. तसे तक्रारअर्ज त्यांनी पोलिसांच्या ‘भरोसा सेल’कडे दिले आहेत. विशेष म्हणजे ही जोडपी मागच्याच वर्षी विवाहबंधनात अडकली आहेत. पहिल्या लॉकडाऊनमध्ये सोशल मीडियावरून चोरून-लपून मित्रमैत्रिणींशी चॅटींग करणाऱ्या अनेकांची प्रकरणे समोर आली. त्यानंतर सुरू झालेले नवरा-बायकोचे भांडण थेट पोलिसांच्या भरोसा सेलपर्यंत येऊन पोहोचले.

लॉकडाऊनमधील या परिस्थितीचा वृत्तान्त ‘दिव्य मराठी’ने मांडला होता. तक्रारअर्जापैकी ९० टक्के जोडप्यांचे विस्कटलेले संसार समुपदेशन करून पुन्हा फुलवण्याचे काम दिलासा सेलने केले होते. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत मात्र विभक्त होण्याचे वेगळेच कारण समोर आले आहे. यावेळी सोशल मीडियावरील चॅटींग नव्हे, तर स्वतःसह कुटुंबाचं पोट भरायचं कसं या विवंचनेतून अनेक नवरा-बायको स्वतःहून विभक्त होण्यास तयार झाले आहेत. त्यात नवविवाहितांचे प्रमाण मोठे आहे.

गेल्यावर्षीच विवाह बंधनात अडकलेल्या तब्बल ५२० जोडप्यांसमोर रोजगाराचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. कोरोनाची पहिली लाट, दुसरीही लाट आणि आता येणाऱ्या तिसऱ्या लाटेमुळे आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालेल का? असा प्रश्न त्यांना सतावत आहे. या विवंचनेतून बाहेर पडण्यासाठी त्यांनी चक्क विभक्त होण्याचा निर्णय घेतला आहे.

अाकडे बोलतात...

  • 750 तक्रारअर्ज पाच महिन्यांत
  • 15 सरासरी दररोज तक्रारअर्ज
  • 520 तक्रारअर्ज नवविवाहितांचे
  • 60 टक्के अर्ज उच्चशिक्षितांचे

लॉकडाउन ही संधी माना!
कोरोनाचं संकट जगभर आहे. त्यातून रोजगारासारखे अनेक प्रश्न उभे राहिले आहेत. मात्र, घाबरून जाऊ नये. आपला संसार टिकून ठेवण्यासाठी लॉकडाउनकडे एक संधी म्हणून पहावे. नवा छंद जोपासावा, रोजगाराच्या नव्या वाटा शोधाव्यात. विभक्त होण्यासाठी आमच्याकडे जे नवरा-बायकोचे तक्रार अर्ज आले आहेत, त्यांचे संसार टिकवून ठेवण्याचा आमचा आटोकाट प्रयत्न आहे.'' पल्लवी देशमुख, सहाय्यक पोलिस निरीक्षक, प्रमुख, भरोसा सेल.

घाईगडबडीत लग्न; निर्माण झाला नोकरीचा प्रश्न
पहिल्या लाॅकडाऊनमध्ये अनेक पालकांनी आपल्या मुला-मुलींची लग्न घाईगडबडीत उरकून घेतली. मुलाला चांगली नोकरी आहे, असे सांगत ते गावभर हिंडले, पण लॉकडाउन लागताच अनेकांना कंपन्यांनी घरचा रस्ता दाखवला. रोजगाराचा प्रश्न उपस्थित होताच नवरा-बायकोत भांडणे सुरू झाली. अखेर सोयीचा मार्ग म्हणून विभक्त होण्याचा निर्णय घेतला असल्याचे विदारक चित्र नगर जिल्ह्यात पहायला मिळत आहे.

लॉकडाऊनमुळे समुपदेशनात येत आहेत अडचणी
दिलासा सेलमध्ये तक्रार अर्ज घेऊन आलेल्या नवरा-बायकोचे समुपदेशन करण्याचे काम आम्ही करतो. वरिष्ठांचे वेळोवेळी मार्गदर्शन असते. मात्र, सध्या लॉकडाऊन सुरू असल्याने समुपदेशन करण्यात अडचणी निर्माण होत आहेत. समुपदेशनाच्या तारखेसाठी संबंधितांना बोलावले जाते. मात्र, त्यांच्या कुटुंबातील कुणीतरी कोविड पॉझिटिव्ह असते, तर कोणाकडे येण्यासाठी पास नसतो, असे असतानाही आम्ही दररोज दहा-पंधरा जोडप्यांचे समुपदेशन करतो.'' उमेश इंगवले, राजेंद्र वाघ, समुपदेशक, भरोसा सेल, अहमदनगर.

बातम्या आणखी आहेत...