आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
विश्वाला श्रद्धा आणी सबुरीबरोबरच सर्वधर्म समभावाची शिकवण देणाऱ्या साईबाबांच्या शिर्डीत सलग सुट्यांमुळे देशाच्या विविध भागातून गर्दी झाली. गेल्या १४ दिवसांत कोरोनाच्या संकटात फिजिकल डिस्टन्सिंग पाळत सुमारे २ लाख पन्नास हजार भाविकांनी साईंच्या चरणी माथा टेकवत साईबाबांच्या झोळीत तब्बल ३ कोटी २३ लाख ९८ हजार २०८ रुपयांचे विक्रमी दान अर्पण केले.
लॉकडाऊननंतर प्रदीर्घ काळानंतर साई मंदिर भाविकांच्या दर्शनासाठी खुले करण्यात आले. साईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी कान्हुराज बगाटे यांनी कोरानाच्या संकटाचा मुकाबला करण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना मंदिर परिसरात केल्या आहेत. १५ ते २८ डिसेंबर या काळातील १४ दिवसात साईबाबा मंदिरात तब्बल अडीच लाख भाविकांनी साईंच्या झोळीत विक्रमी दानही अर्पण केले.
राज्य सरकारच्या मार्गदर्शक नियमावलीनुसार विविध उपाययोजना राबवत साईमंदिर दर्शनासाठी खुले करण्यात आले. देशाच्या विविध भागातून साईबाबांच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना दर्शनासाठी व्यवस्था करण्यात आली आहे. संस्थान प्रशासनाच्या या व्यवस्थेचे साईभक्तांनी कौतुक केले आहे. गेल्या चौदा दिवसांत सुमारे अडीच लाख भाविकांनी दर्शन घेतले. १५ ते २८ डिसेंबर या १४ दिवसांच्या काळात भाविकांकडून सुमारे ३ कोटी २३ लाख २०८ रुपयांची देणगी संस्थानला मिळालेली आहे. याच देणगीतून साई भक्तांसाठी साई संस्थानकडून विविध पायाभूत सुविधांबरोबरच रुग्णसेवा आणि प्रसादालयासाठी खर्च करण्यात येतो, असे कान्हुराज बगाटे यांनी सांगितले.
तृतीयपंथीयांची साईबाबांचरणी ११ लाख रुपयांची देणगी
चंदीगड येथील तृतीयपंथी समाजाच्या साईभक्त सोनाक्षी व त्यांच्या १० सहकाऱ्यांनी श्री साईबाबा संस्थानाला रोख स्वरुपात ११ लाख रुपये देणगी दिली. कोरोनाचे संकट लवकरात लवकर दूर करावे यासाठी या तृतीयपंथीयांनी साईबाबांना साकडेही घातले. साईभक्तांनी देणगी दिलेली असल्याने संस्थानकडून दर्शन आरतीचा मोफत पास उपलब्ध असूनही त्यांनी त्यास नम्रपणे नकार देऊन दर्शनरांगेतून दर्शन घेणे पसंत केले.
दरम्यान, संस्थानच्या वतीने या सर्वांचे आभार देखील मानण्यात आले आहे. याप्रसंगी देणगीदार साईभक्त सोनाक्षी व त्यांच्या सहकार्यांचा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी कान्हूराज बगाटे यांनी त्यांचा सत्कार करुन आभार मानले.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.