आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुहूर्त...:अहवाल गुलदस्त्यातच; “फायर फायटर’ बसले, पण चाचणीला लागेना मुहूर्त...

बंडू पवार | नगरएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

जिल्हा रुग्णालयातील अतिदक्षता विभागात गेल्या वर्षी भाऊबिजेच्या दिवशी लागलेल्या आगीत ११ व उपचारादराम्यान ३ अशा १४ जणांचा मृत्यू झाला होता. या घटनेला रविवारी (६ नोव्हेंबर) वर्ष पूर्ण होत आहे. या घटनेनंतर चौकशीसाठी नियुक्त केलेल्या समितीने कागदपत्रे जुळवून तयार झालेल्या अहवालाची फाईल मंत्रालयात सादर केली मात्र या चौकशी अहवालात काय होते ? हे मात्र वर्षभरानंतरही गुलदस्त्यातच आहे. दरम्यान, अग्निकांडानंतर अडीच कोटी रुपये खर्च करून जिल्हा रुग्णालयात बसवण्यात आलेल्या फायर फायटर यंत्रणेचे काम जवळपास पूर्ण झाले असले तरी केवळ चाचणीसाठी मुहूर्त अडला आहे. नव्याने तयार होत असलेल्या ६० आयसीयू बेडच्या पक्षाचे काम पूर्णत्वाकडे जात असले तरी कामाच्या वेग मात्र धिमाच आहे.

नगर जिल्हा रुग्णालयातील अतिदक्षता विभागाला लागलेल्या आगीत कोरोना उपचारासाठी दाखल झालेल्या ११ रुग्णांचा मृत्यू झाला होता. तर उपचारादरम्यान आणखी तिघांचा मृत्यू झाला होता. आगीच्या घटनेनंतर तत्कालीन महाविकास आघाडी सरकारमधील मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या घटनेची गंभीर दखल घेऊन चौकशी करण्याचे आदेश दिले होते.

घटनेनंतर केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री भारती पवार, तत्कालीन आरोग्य मंत्री राजेश टोपे, मंत्री बाळासाहेब थोरात, विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांच्यासह अन्य मंत्र्यांनी जिल्हा रुग्णालयाला भेट दिली तसेच मृतांच्या कुटुंबियांचे सांत्वन केले. टोपे यांनी जिल्हा रुग्णालयाला भेट दिल्यानंतर या घटनेचा चौकशी अहवाल सात दिवसांत सादर करण्याचे निर्देश यंत्रणेला दिले होते. त्यानंतर प्रकरणाच्या चौकशीसाठी विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांच्या अध्यक्षतेखाली समितीची नियुक्त करण्यात आली. या समितीने जिल्हाधिकारी कार्यालयात दोन बैठका घेतल्या तसेच जिल्हा रुग्णालयाला भेटी दिल्या. काहींचे जबाब नोंदवले. प्रशासकीय स्तरावरून कागदोपत्री तयार केलेली फाईल विभागीय आयुक्तांनी मंत्रालयात सादर केली. मात्र या चौकशी अहवालात काय होते हे मात्र अद्यापही स्पष्ट होऊ शकले नाही.

विशेष म्हणजे तत्कालीन पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी घेतलेल्या प्रत्येक वेळीच्या पत्रकार परिषदांमध्ये अहवालाबाबत विचारणा केली जायची मात्र त्यांच्याकडे या अहवालाबाबत उत्तर नव्हते. सत्तांतरानंतर विद्यमान पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांच्या पहिल्या पत्रकार परिषदेतही हाच प्रश्न उपस्थित करण्यात आला होता. वर्षभरानंतही चौकशी अहवाल गुलदस्त्यातच आहे. त्यामुळे आग कशामुळे लागली ? त्याला जबाबदार कोण याचे उत्तर कुठल्याच यंत्रणेकडे नाही. घटनेनंतर जिल्हा नियोजन समितीतून झालेल्या निधीतून अडीच कोटी रुपये खर्च करून जिल्हा रुग्णालयात अग्निशामक यंत्रणा बसवण्यात आली मात्र केवळ चाचणी करणे बाकी राहिले आहे.

‘दिव्य मराठी’च्या वृत्तानंतर काम सुरू
आगीच्या घटनेनंतर पोलिसांनी पंचनामा करून जळालेल्या अतिदक्षता विभागाला सील केले होते. त्यामुळे कोरोनाच्या कालावधीत कोरोना रुग्णांना कुठे दाखल करायचे हा प्रश्न आरोग्य यंत्रणे पुढे होता. आगीच्या घटनेनंतर ७९ दिवस हा कक्ष बंद होता. ‘दिव्य मराठी’च्या वृत्तानंतर या जळालेल्या आयसीयू कक्षाचे काम पुन्हा सुरू झाले.

‘एनओसी’ नंतर कक्ष कार्यान्वित
नव्याने ६० बेडचा आयसीयू कक्ष लवकरच कार्यान्वित होणार आहे. त्याचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. बांधकाम विभागाकडून एनओसी मिळताच या कक्षात रुग्णांना उपचारासाठी दाखल करता येणार आहे. जिल्हा रुग्णालयातील अग्निशामक यंत्रणा बसवण्याचे काम देखील पूर्ण झाले आहे केवळ चाचणी बाकी आहे. डॉ. संजय घोगरे, जिल्हा शल्य चिकित्सक

निलंबन, आंदोलन व नेत्यांच्या भेटी
जिल्हा शासकीय रुग्णालयातील अग्निकांडानंतर निलंबनाची कारवाई करण्यात आली त्यानंतर परिचारिका संघटनेच्या वतीने जिल्हा शासकीय रुग्णालयातील परिचारिकांनी काम बंद आंदोलन केले होते. काम बंद आंदोलन आणि नेत्यांच्या भेटीमुळे जिल्हा शासकीय रुग्णालयातील नियमित होणारे काम देखील विस्कळीत झाले होते.

बातम्या आणखी आहेत...