आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करासंगमनेर तालुक्यातील जोर्वे ग्रामपंचायतीत बाळासाहेब थोरात गटाला झटका देत जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील गटाच्या प्रिती दिघे सरपंच म्हणून निवडून आल्या तर श्रीगोंद्यातील काष्टी ग्रामपंचायतमध्ये भाजप नेते बबनराव पाचपुते यांचे चिरंजीव प्रतापसिंह पाचपुते यांना चुलत भावाकडूनच पराभवाचा सामना करावा लागला.
सदाअण्णा पाचपुते यांचे चिरंजीव साजन पाचपुते या निवडणुकीत विजयी झाले. बेलवंडी ग्रामपंचायतच्या सरपंचपदी जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष अण्णासाहेब शेलार यांचे चिरंजीव ऋषिकेश शेलार विजयी झाले आहेत. संगमनेर तालुक्यातीलच निळवंडे ग्रामपंचायतीच्या सरपंच पदी इंदोरीकर महाराज यांच्या सासुबाई शशिकला शिवाजी पवार सरपंचपदी विराजमान झाल्या आहेत.
जिल्ह्यात २०३ ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया जाहीर झाली होती, त्यापैकी ८ ग्रामपंचायत बिनविरोध झाल्याने १९५ ग्रामपंचायतींसाठी २० डिसेंबरला मतदान प्रक्रिया पार पडली. या निवडणुकीचा निकाल मंगळवारी जाहीर झाला. या निवडणुका स्थानिक आघाड्या करूनच लढवल्या जातात, परंतु कोणत्या पक्षाच्या किती ग्रामपंचायती विजयी होणार याची उत्सुकता राज्यभरात होती.
अहमदनगर जिल्ह्यात शेवगाव तालुक्यात काकडे गटाची जनशक्ती विकास आघाडी, श्रीरामपूर तालुक्यात मुरकुटे, ससाणे गटासह कांबळे, कानडे व विखे गटाने बाजी मारली. संगमनेर तालुक्यातील ३७ ग्रामपंचायतींपैकी २७ ग्रामपंचायती काँग्रेस माजी महसूल मंत्री आमदार बाळासाहेब थोरात गटाच्या ताब्यात राहिल्या, तर उर्वरीत ९ ग्रामपंचायतीत महसूल मंत्री राधाकृष्ण विखे विखे गटाने विजय मिळवला. नेवासे तालुक्यात आमदार शंकरराव गडाख गटाने सर्व १३ ग्रामपंचायतींवर विजय मिळवला.
राजकारणाच्या बालवाडीत काही पास.. काही नापास!
ग्रामपंचायतीची निवडणूक म्हणजे राजकारणातील बालवाडीची एक परीक्षाच असते. पंचायत समिती आणि जिल्हा परिषद, अर्थातच दहावी आणि बारावीच्या परीक्षेची पूर्वतयारी आणि विधानसभेची पदवीचा राजमार्ग. यंदा प्रस्थापितांच्या मुलाबाळांनी, नातेवाईकांनी ही परीक्षा दिली. काही पास तर काहींवर नापासचा शिक्का बसला. परंतु घराणेशाहीची सत्ता अबाधित ठेवण्यात मात्र जिल्ह्यातील सर्वच नेते यशस्वी ठरले.
बाळासाहेब थोरातांच्या घुलेवाडीत अपक्ष सरपंच
काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांच्या हक्काची ग्रामपंचायत म्हणून ओळखली जाणारी घुलेवाडी ग्रामपंचायत चुरसीच्या निवडणुकीमुळे चांगलीच गाजली. थोरात गटाला पराभूत करण्यासाठी अन्य सर्वच पक्षांनी एकत्र येऊन अपक्ष उमेदवार निर्मला कैलास राऊत यांना विजयी केले. विशेष म्हणजे या ग्रामपंचायतीसाठी संगमनेर सहकारी साखर कारखाना, शिक्षण संस्था, दुधसंघ यांचे सभासद कर्मचारी असे मतदान मोठ्या प्रमाणावर आहे.
राष्ट्रवादी काँग्रसेचा ८३ ग्रामपंचायतींवर दावा
जिल्ह्यातील २०३ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीचे निकाल हाती आल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसने तब्बल ८३ ग्रामपंचायतींवर विजय मिळवल्याचा दावा केला आहे. पक्षीय बलाबलाचे पत्रक पक्षाने जारी केले असून त्यात काँग्रेसला २८, शिवसेना ठाकरे गट १६, भाजप ५९ तर सेना-शिंदे १ व इतर आघाड्यांनी ९ ग्रामपंचायतींवर विजय मिळवला.
चर्चेतील गावांचा निकाल
जोर्वे : माजी महसलूमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या जोर्वे गावात महसूलमंत्री राधाकृष्ण विखेंनी काँग्रेसला जोरदार धक्का दिला.
काष्ट्ी : श्रीगोंदे तालुक्यातील काष्टी ग्रामपंचायतीत आमदार बबनराव पाचपुते यांचे पुत्र प्रतापसिंह पाचपुते यांचा काँग्रेसचे साजन पाचपुते यांनी १६१ मतांच्या फरकाने पराभव केला.
निळवंडे : निळवंडे ग्रामपंचायतीत इंदोरीकर महाराजांच्या सासु शशिकला शिवाजी पवार विजयी होऊन सरपंचपदी विराजमान झाल्या आहेत.
निमगाव जाळी, उंबरी बाळापूर : विखे गटाच्या प्रतिष्ठेतील निमगावजाळी, उंबरी- बाळापूर ग्रामपंचायतीवर थोरात गटाने विजय मिळवला आहे. जिल्ह्यातील सर्वात श्रीमंत घुलेवाडी ग्रामपंचायतीच्या सरपंच पदी अपक्ष उमेदवार निर्मला कैलास राऊत यांनी विजय मिळवल्याने, थोरात व विखे गटाने त्या आपल्याच उमेदवार असल्याचा दावा केला आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.