आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Ahmednagar
  • In Three Years, 108 Financial Scams Were Uncovered; The Types Of Frauds In Banks And Credit Unions Are Increasing Day By Day In The District |marathi News

गुन्हेगारी:तीन वर्षांत 108 आर्थिक घोटाळेखोर झाले गजाआड‌‌‌; जिल्ह्यात दिवसेंदिवस बँका, पतसंस्थांमधील फसवणुकीचे प्रकार वाढले

नगर2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

जिल्ह्यात दिवसेंदिवस आर्थिक फसवणूक व बँका पतसंस्थांमधील कर्ज प्रकरणातील फसवणूक, अपहाराच्या गुन्ह्यांमध्ये वाढ झाली आहे. मागील तीन वर्षात ५० लाखांहून अधिक रकमेच्या तब्बल ५४ घोटाळ्यांचे तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आले आहेत. सद्यस्थितीत १४३ कोटींच्या घोटाळ्याचा तपास प्रगतिपथावर आहे. तर तीन वर्षात १०८ घोटाळेखोरांना पोलिसांनी गजाआड केले आहे. कर्ज प्रकरणातील अनियमितता, बनावट व्हॅल्युएशनद्वारे घेतले गेलेले कर्ज, बनावट सोने तारण कर्ज, कर्जाच्या रकमेच्या गैरवापर आदी विविध माध्यमातून जिल्हाभरात बँका व पतसंस्थांमध्ये गैरप्रकार वाढत आहेत. नगर जिल्ह्यात मागील काळात नगर अर्बन, शहर सहकारी या प्रमुख बँकांमधील गैरप्रकार उघडकीस आलेले आहेत. तकाही महिन्यांपूर्वी ‘फंड पे ॲप’च्या नावाखाली बिग मी इंडिया कडून राज्यभरातील शेकडो गुंतवणुकदारांची झालेली कोट्यवधींची फसवणूक अद्यापही चर्चेत आहे.

कायद्यानुसार ४९ लाखांच्या रकमेवरील फसवणूक, गैरव्यवहार व अपहाराच्या गुन्ह्यांचा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग केला जातो. मागील तीन वर्षात अशी ५४ प्रकरणे नगरच्या आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग झाली आहेत. या प्रकरणात आर्थिक गुन्हे शाखेने आतापर्यंत १०८ घोटाळेखोरांना गजाआड केले आहे. अनेक गैरव्यवहारांमध्ये बनावट कागदपत्रांचा वापर होत असल्याचेही तपासात पुढे आले आहे. अशा बनावट अहवालांसंदर्भातही पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत.

६२ गुन्ह्यांमध्ये न्यायालयात दोषारोपपत्र
आर्थिक फसवणुकीच्या गुन्ह्यांमध्ये बँक, पतसंस्थांमधील कर्ज फसवणुकीच्या गुन्ह्यांची संख्या अधिक आहे. बँकिंग कायद्यातील तरतुदी, कागदपत्रे या सर्वांच्या आधारावर अशा गुन्ह्यांचा तपास केला जात आहे. अद्यापपर्यंत कोट्यवधी रुपयांच्या फसवणूक प्रकरणात ६२ गुन्ह्यांमध्ये न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्यात आले आहेत.

गुंतवणूकदार, ठेवीदार मात्र वाऱ्यावर
फसवणूक प्रकरणांत आर्थिक गुन्हे शाखेकडून तपास होऊन दोषारोप पत्र दाखल केले जात आहेत. आरोपी जामीन घेऊन सुटले आहेत. मात्र, फसवणूक झालेल्या गुंतवणूकदारांना रकमा परत न मिळाल्याने त्यांची फरफट सुरू आहे. गैरव्यवहारांमुळे ज्या बँका, पतसंस्थात ठेवीदारांच्या रकमा अडकलेल्या आहेत, त्यांना त्या परत कधी मिळणार, असा सवाल उपस्थित होत आहे.

आर्थिक गुन्हे शाखेचे बळकटीकरण आवश्यक
दिवसेंदिवस वाढत असलेल्या आर्थिक फसवणुकीचे प्रकार व या गुन्ह्यांची व्याप्ती, फसवणुकीची क्लिष्ट प्रक्रिया या सर्वांचा तपास करताना आर्थिक गुन्हे शाखेला अनेक आव्हानांचा सामना करावा लागतो. गुन्ह्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याने त्यादृष्टीने आर्थिक गुन्हे शाखेचे बळकटीकरण करणे आवश्यक आहे.

बातम्या आणखी आहेत...