आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्वच्छ भारत अभियान:तीन वर्षात स्वच्छतेच्या 422 पैकी 28 कामांनाच कार्यारंभ आदेश ; पाणीपुरवठा विभागाचा ढिसाळ कारभार

नगर/ दीपक कांबळे5 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

जिल्हा परिषदेत पाणीपुरवठा व स्वच्छता विभाग तसेच ग्रामीण पाणीपुरवठा विभाग यांच्या समन्वयातून ग्रामीण भागात घनकचरा व सांडपाणी व्यवस्थापन प्रकल्प उभारण्यात येणार आहेत. पाच लाखांवरील ४२२ कामांना प्रशासकीय मान्यता मिळाली असून, त्यात पंधरा लाखांवरील २१४ मोठ्या कामांचाही समावेश आहे. ग्रामीण पाणीपुरवठा विभागाकडून निविदा प्रक्रिया राबवण्यात विलंब केला जात असल्याने २०२०-२१ पासून अवघ्या २८ कामांनाच कार्यारंभ आदेश देण्यात आल्याचे वास्तव समोर आले आहे. प्रशासकीय दिरंगाईत प्रकल्प उभारणीत विलंब होत असल्याचे स्पष्ट झाले आहे.

जिल्ह्यात स्वच्छ भारत मिशन ग्रामीण टप्पा दोन अंतर्गत ग्रामस्तरावर घनकचरा आणि सांडपाणी व्यवस्थापन प्रकल्पाचे नियोजन करण्यात येत आहे. या उपक्रमामुळे गावात वैयक्तिक आणि सामुदायिक स्वच्छता सुविधा उपलब्ध होणार आहेत. अहमदनगर जिल्हा २०१८ मध्येच हागणदारी मुक्त झाल्याचा प्रशासकीय दावा स्वच्छता विभागाकडून केला जात असला, तरी त्यात सातत्य राहिले नाही. आता ग्रामस्तरावर घनकचरा व सांडपाणी व्यवस्थापनाचे काम करताना तांत्रिक मान्यता प्राप्त झाल्यानंतर स्वच्छता विभाग त्यास प्रशासकीय मान्यता देतो. प्रशासकीय मान्यतेनंतर निविदा प्रक्रिया राबवण्याची जबाबदारी ग्रामीण पाणी पुरवठा विभागाची आहे. २०२०-२१ पासून ४२२ प्रशासकीय मान्यता झाले आहेत. त्यापैकी अवघ्या ८१ निविदा प्रक्रिया राबवून केवळ २८ कामांना कार्यारंभ आदेश दिले. कामातील दिरंगाईमुळे योजनेच्या कामांना गती मिळालेली नाही.

निविदा प्रक्रियेलाच होतोय विलंब
सांडपाणी व्यवस्थापनाच्या कामाच्या तांत्रिक मान्यता झाल्यानंतर प्रशासकीय मान्यता दिल्या जातात. शासकीय मान्यतेनंतर विविध प्रक्रिया राबवणे आवश्यक आहे. तथापि प्रशासकीय मान्यता होऊन अनेक महिने उलटले तरी निविदा प्रक्रियेला विलंब होत असल्याने प्रशासकीय कामकाजाबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

ग्रामीण भागात ही कामे प्रस्तावित
गावातील सांडपाणी व्यवस्थापन करण्यासाठी कंपोस्ट खत निर्मिती, शोषखड्डे, पाझर खड्डा तसेच सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प उभारले जाणार आहेत. स्वच्छ भारत मिशनचा हा महत्त्वपूर्ण टप्पा केवळ ग्रामीण पाणी पुरवठा विभागातील ढिसाळ कारभारामुळे १५ लाखांवरील कामेही अद्याप कागदावरच आहे.

कार्यारंभ आदेश देऊन वर्ष झाले पण कामाला सुरुवात नाही
आमच्या गावात सांडपाणी व्यवस्थापनाचे काम मंजूर असून त्यासाठी आवश्यक रकमेची तरतूद केली आहे. या कामाला कार्यारंभ आदेशही मिळाले परंतु अद्याप कामाला सुरुवातच झाली नाही.''
संजय कोतकर, माजी सरपंच गुंडेगाव.

ठराव येण्यास होतोय विलंब
कामाला गती देण्याचा प्रयत्न आहे. परंतु टेंडर फ्लॅश करण्यापूर्वी संबंधित गावाने आवश्यक निधीची तरतूद करून तसा ठराव पाठवणे आवश्यक आहे. परंतु ग्रामपंचायतकडून ठराव पाठवण्यासाठी विलंब होत आहे.'' एस. एस. गडदे, कार्यकारी अभियंता, जिल्हा परिषद.

बातम्या आणखी आहेत...